Tuesday , March 3 2026
Breaking News

“१५ वर्षांची जट कापून अंधश्रद्धेला छेद; कागवाडमध्ये परिवर्तनाची नवी पहाट”

Spread the love

 

कागवाड येथे जटा निर्मूलनाचा यशस्वी उपक्रम; सामाजिक जागृतीचा आदर्श

कागवाड / प्रतिनिधी : कागवाड (कर्नाटक) येथे सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दर्शवणारा जटा निर्मूलनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आज यशस्वीरित्या पार पडला. सौ. कमल आण्णाप्पा वाघमोरे या देवदासी मावशींची तब्बल १५ वर्षांपासून वाढत गेलेली सुमारे ६ फूट लांबीची आणि अंदाजे ६ किलो वजनाची जट अत्यंत संयम, काळजी आणि वैद्यकीय दक्षता पाळून काढण्यात आली. धार्मिक समजुती आणि अंधश्रद्धेमुळे दीर्घकाळ जपली गेलेली ही जट काढण्याचा निर्णय हा सामाजिक धाडस आणि नव्या विचारांचा प्रेरणादायी नमुना ठरला आहे.

या उपक्रमासाठी राष्ट्र सेवा दल चे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच शिरोळ तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) चे मार्गदर्शक बाबासाहेब नदाफ यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुका कार्याध्यक्ष खंडेराव हेरवाडे आणि तालुका कार्यवाह सचेतन बनसोडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
यासोबतच प्रा. अशोक आलगोंडी (कागवाड) आणि प्रा. संजय माने (कवठे गुलंद) यांचे विशेष सहकार्य लाभले. गडहिंग्लज येथील सेवादल कार्यकर्ते व अनिसचे मार्गदर्शक अरविंद बारदेस्कर यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली होती. बाबासाहेब नदाफ म्हणाले, “जटा निर्मूलन हा केवळ केस कापण्याचा कार्यक्रम नसून तो सामाजिक बंधनांपासून मुक्त होण्याचा आणि आरोग्यदायी जीवनाचा स्वीकार करण्याचा संदेश देणारा उपक्रम आहे.”
जट काढण्यापूर्वी संबंधित महिलेची समुपदेशनाद्वारे मानसिक तयारी करण्यात आली. कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे समजावून सांगण्यात आले. दीर्घकाळ जपलेली जट काढल्यानंतर सौ. कमल वाघमोरे यांनी हलकेपणा आणि समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी त्यांचे पती श्री. आण्णाप्पा वाघमोरे, मुलगी अनिता आनंद बोबडे, नातू ऋत्विक आनंद बोबडे तसेच नाती कु. गार्गी श्रावण वाघमोरे आणि कु. परी श्रावण वाघमोरे उपस्थित होते. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे हा निर्णय अधिक दृढ झाला आणि उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेला.
जटा निर्मूलन हा महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जटेमुळे डोकेदुखी, त्वचारोग, जंतुसंसर्ग यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढते आणि अंधश्रद्धेविरुद्ध सकारात्मक वातावरण निर्माण होते.
कागवाड येथे झालेल्या या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जागृतीचा संदेश पोहोचला असून, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला अधिक बळ मिळणार आहे. समाजप्रबोधनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *