
मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या निधीतून शाळेला नवे रूप; देसूर काँग्रेस कमिटीच्या वतीने पूजन संपन्न
देसूर : येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या मंगल दिनाचे औचित्य साधून, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी मंजूर केलेल्या शाळेच्या नूतनीकरण आणि रंगकाम कामाचा प्रारंभ देसूर काँग्रेस कमिटीच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवगर्जना आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शाळेच्या इमारतीची अवस्था पाहून ना. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी तातडीने निधी मंजूर केला होता. या कामाचे प्रत्यक्ष पूजन आज करण्यात आले असून, लवकरच ही मराठी शाळा नव्या रंगरूपात दिसेल.
देसूर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी बोलताना सांगितले की, “मराठी शाळा टिकवणे आणि त्या सुसज्ज करणे हे आमचे कर्तव्य आहे. मंत्री महोदयांच्या माध्यमातून देसूरमधील शैक्षणिक सोयीसुविधांसाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.”
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, देसूर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या या नवीन बदलामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Belgaum Varta Belgaum Varta