शहरवासीयांकडून संतापाच्या प्रतिक्रिया : कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी
निपाणी : बोरगाव नगरपंचायतीचे नगरविकास अधिकारी परशुराम देवमाने यांनी कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळे रुग्ण संख्येला आळा बसला होता. असे असतानाही प्रशासनाने त्यांची तडकाफडकी बदली केल्याने शहरवासियांमधून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बोरगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून नगरविकास अधिकारी परशुराम देवमाने हे नगर पंचायतीचा कार्यभार सांभाळत आहेत. प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परशुराम देवमाने यांची परिसरात ओळख आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सर्वसामान्यांची कामे करत शहराला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सातत्याने सोडवण्यासाठी व शहरवासीयांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नगरविकास अधिकारी देवमाने यांनी केलेले काम अतुलनीय आहे. बोरगाव शहर हे महाराष्ट्र लगतचे प्रारंभीचे गाव असल्याने या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे नगरपंचायतीच्या माध्यमातून सीमाभागात विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी देवमाने यांनी मोलाची भूमिका बजावली होती. अशा कर्तबगार अधिकाऱ्यास कोणतीही कल्पना नसताना अचानक बदली करणे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहेत. सध्या नगरपंचायतीच्या माध्यमातून कोरोना संक्रमण दूर करण्यासाठी शासकीय यंत्रणा गेल्या महिना भरापासून नियोजन करीत आहे. यासाठी नगरपंचायत अधिकारी परशुराम देवमाने यांचा नेहमीच पुढाकार आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची झालेली बदली थांबवून त्यांना पुन्हा बोरगाव नगर पंचायतीमध्ये नियुक्ती करण्यात यावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे.