बेळगाव : खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे आपल्या भाषणात सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी अशी जाहीर घोषणा केली. सदर घोषणा करण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, मला सीमाभागातील एक शिष्टमंडळ नुकतेच भेटून गेले.
आजवर सीमाप्रश्नासंदर्भात जे काही छोटे-मोठे कार्यकर्ते महाराष्ट्रातील नेत्यांना भेटले ते छाती ठोकपणे भेटले, उजळमाथ्याने भेटले. पण हे जे गेलेले ‘खावा समिती’ शिष्टमंडळ आपले तोंड चुकवून हिंडत आहे. ‘मुखपत्राचा’ ‘लोकमान्य भत्ता’ खाऊन झारीतल्या शुक्राचार्याची तळी उचलत आहेत. सीमाप्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना अशी खोडसाळ मागणी करणे सीमाप्रश्नासाठी घातक आहे. हे सीमावासियांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आहे. ही मागणी करणारे झारीतील शुक्राचार्यासाठी काम करणारे कोण आहेत हे लवकर सीमाभागातील जनतेला समजले पाहिजे, अशी मागणी सीमाभागातून होत आहे. अशा चुकीच्या पद्धतीने हे लोक सीमाप्रश्नाचा घात करीत आहेत या लोकांना वेळीच आवर घातला पाहिजे असे प्रतिक्रिया सीमाभागातून व्यक्त होत आहेत. एरवी आपल्या प्याद्यांचे कायम मुखदर्शन घडवण्यात हयगय न करणाऱ्या ‘मुखपत्राने’ यावेळी पहिल्या पानावरील या बातमीत कोणताही फोटो का छापला नाही, हे भत्ता खाणाऱ्या ‘खावा समितीचे’ गौडबंगाल आहे.