चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
आज चंदगड तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची चंदगड येथे बैठक झाली. यामध्ये तालुक्यातील पदाधिकारी यांनी आपली मतं व्यक्त केली. यावेळी उपस्थित पदाधिकारी म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (गटातून) शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करून एक वर्ष होऊन गेले तरी पक्षाकडून तालुक्यातील पदाधिकारी यांना कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. चंदगड तालुक्यातून गेल्या वर्षी दसरा मेळाव्यासाठी 20 ट्रॅव्हल्स भरून शिवसैनिकांना मुंबईला घेऊन गेलो. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इतके शिवसैनिक कोणीही घेऊन गेले नाहीत. पक्षाकडून एक रुपया सुद्धा मिळाला नाही. त्यानंतर 40 ग्रामपंचायत निवडणूका लढविल्या त्यामध्ये 9 सरपंच व 61 ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले. त्यावेळी पण पक्षाकडून एक रुपया सुद्धा मिळाला नाही. तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाचे शाखा प्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, कामगार सेना सर्व पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या पक्षाचे काम जोमाने सुरू केले. पण एक वर्ष होऊन गेले तरी पक्षाकडून एक रुपया निधी मिळाला नाही. पक्षाचे सचिव, निरिक्षक, वरिष्ठ यांना वेळोवेळी भेटून निवेदन देऊन सर्व तक्रारी कळविण्यात आल्या पण कोणीही दखल घेत नाही. म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला आहे की, पक्षाच्या वरिष्ठांनी ह्याची आठ दिवसांत दख्खल घेऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडवला नाही तर आपण सर्वांनी होतो त्या मुळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करण्याचे ठरविले आहे, तसे पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे पत्र पक्षाकडे पाठविण्यात आले आहे.