गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना जिल्ह्यातील कागल व चंदगड या जागा महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निश्चित मानली जात आहे. यामध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांना चंदगडच्या उमेदवारीचे संकेत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी पवारांचा उमेदवार अमान्य करण्याचे धोरण अवलंबले असून, यातूनच रविवारी डॉ. बाभूळकर यांना वगळून मेळावा घेण्याचे नियोजन केल्याने उमेदवारी घोषणेपूर्वीच ‘मविआ’त फूट पडल्याचे दिसून येत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना मविआमध्ये अशा पद्धतीने घडामोडी सुरू झाल्याने नेमके चंदगड विधानसभा मतदारसंघात होणार तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. डॉ. बाभूळकर यांनी विधानसभेचे दोन स्वतंत्र मेळावे घेऊन उमेदवारीसाठी आपण प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र मविआतील अन्य घटक पक्षांनी यावर आक्षेप घेत सवतासुभा मांडण्याची तयारी ठेवली आहे.
काँग्रेसचे तिन्ही इच्छुक यामध्ये आघाडीवर असून, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखही यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे मविआमध्ये समझोता होणार तरी कसा, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. रविवारी होणार्या मेळाव्यातही उमेदवारीच्या विषयावर निर्णय होईल, असे वाटत नाही. डॉ. बाभूळकरांना वगळून उमेदवारी द्या, अशी मागणी केली जात असली तरी नेमकी कोणाला द्यावी, यामध्ये त्यांच्यातच एकमत होताना दिसत नाही.
Belgaum Varta Belgaum Varta