चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : जांबरे मध्यम प्रकल्पावर बीओटी तत्वावर वीज निर्मिती प्रकल्पाचे काम गेल्या वर्षभरापासून प्रगतीपथावर असून या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप पूर्ण झालेले नाही.
हा वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण होईल,असे पत्र लघुपाटबंधारे बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी अडकूर येथील संदीप अर्दाळकर यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात पाठविले होते. मात्र, पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी काम पूर्णत्वास गेलेले दिसत नाही. त्यामुळे यंदा तरी प्रकल्प पूर्ण होईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जांबरे मध्यम प्रकल्पावर बीओटी तत्वाने वीज निर्मिती प्रकल्प होत असून जलविद्युत गृह, कालव्याचे खोदकाम तसेच ३३ के.व्ही. उच्चदाब विद्युत वाहिनीचे काम प्रगतीपथावर अशी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तरी या पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले होते. मात्र, अजूनतरी काम पूर्ण झालेले नाही. गेल्यावर्षीच्या पूरपरिस्थितीनंतर पाण्याचे नियोजन याबाबत शासकीय पातळीवर संदीप अर्दाळकर यांनी पत्रव्यवहार चालवला आहे. वीज निर्मिती झाली तर त्यासाठी पाण्याचा वापर वाढून प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. त्यासाठी अर्दाळकर यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. पावसाळा जवळ येऊनही यावर्षी पावसाळ्यात वीज निर्मिती करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या हालचाली दिसत नाहीत. सबस्टेशन, वहिनी जोडणी, यंत्र सामुग्री जोडणीची अजून काही कामे झलेली नाहीत. त्यामुळे कंपनीने आतातरी तातडीने काम पूर्ण करून प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरू करावी, अशी मागणी अर्दाळकर यांनी केली आहे