
बेळगाव : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरी बाजारात चांगलीच उलाढाल झाली असून बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील इटनाळ गावात बकरी दराने उच्चांक गाठला. दोन बकरी तब्बल 5 लाख 10 हजार रुपयांना विकली गेली.
इटनाळच्या शिवाप्प शेंडूरे यांनी पाळलेल्या दोन बकऱ्यां तब्बल 5.10 लाखांना विकल्या गेल्या.
यापैकी एक बकरे 3 लाखांना तर दुसरे बकरे 2 लाख 10 हजार रुपयांना विकले गेले. विजापूर येथील व्यापारी मोजीम व आसिफ यांनी ही दोन्ही बकरी खरेदी केल्याचे समजते.
बकरी ईदसाठी तब्बल 15 दिवस आधीच या बकऱ्यांसाठी ऍडव्हान्स रक्कम देण्यात आली होती आणि नुकतेच बाकीचे पैसे देऊन बकरी विकण्यात आली. बकऱ्यांवर गुलाल उधळून तसेच त्यांना हार घालून, पूजा अर्चा केल्यानंतर बकऱ्यांची आरती ओवाळून बकऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. 4 फूट उंचीच्या या दोन्ही बकऱ्यांचे वय 2.5 वर्षे असून, प्रत्येक बकऱ्याचे वजन सुमारे दोन क्विंटल आहे. मूळची पंजाबची बिटल जातीची ही बकरी अंगाने मोठी, लांब कान व लहान चेहऱ्याची आहेत. या जातीच्या बकऱ्यांच्या मांसासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. बकरी ईदच्या काळात विशेषतः बीटल जातीच्या बकऱ्यांना प्रचंड मागणी असते, कारण या जातीचे मांस दर्जेदार असते असे सांगितले जाते.
Belgaum Varta Belgaum Varta