
सदलगा : येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अंदमानातील काळकोठडीतील राजकैद्याचे जीवन जगत असतानाच्या त्यांनी भोगलेल्या यातना, तसेच केवळ काळ्या पाण्याची शिक्षा, मार्सोलिसच्या बंदरावरील सावरकरांची उडी, त्यांचे क्रांतीकार्य हे इतकेच नसून त्यांच्या मराठी साहित्यातील त्यांचे उत्कट लेखन, संस्कृतचा प्रभाव असणाऱ्या कविता, कमला काव्य, आणखीही भरपूर साहित्यकृती यांच्याबाबत अस्पर्श माहिती देणारी डॉ अमर अडके, डॉ. ज्योती चिंचणीकर यांची व्याख्याने झाली.
औचित्य होते, नुकतेच जून २०२५च्या पहिल्या आठवड्यात अतुल जोशी यांनी पार्थ बावस्कर आणि शरद पोंक्षे यांच्या समवेत अंदमान पुण्य क्षेत्राची तीर्थयात्रा केली. या अंदमान भेटीच्या अनुषंगाने सद्यस्थितीत तिथे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, कोणकोणती बेटे प्रेक्षणीय आहेत, कोणत्या बेटांवर आदिवासींचा अद्याप निवास आहे आणि प्रामुख्याने चांदणीच्या आकाराचे सेल्युलर तुरुंग याबद्दल माहिती अतुल जोशी यांनी दिली. सावरकरांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी कैद्यांना जिथे फाशी दिली जायची ते दृष्य सावरकरांच्या कोठडीतून दिसले पाहिजे अशाच ठिकाणच्या त्यांची कोठडीत सावरकरांना ठेवले होते. ती कोठडी आणि फाशीची वेदी पाहताना मन उद्विग्न होऊन जाते हेही अनुभवल्याचे जोशींनी सांगितले. आठवड्याच्या वास्तव्यात दररोज पार्थ बावस्कर आणि शरद पोंक्षे यांचे संध्याकाळी सावरकरांच्या जीवनावर व्याख्यान ऐकण्याची संधी उपलब्ध असायची यामुळे भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतीकार्याची शिक्षा म्हणून ज्या हाल अपेष्टा सावरकरांनी प्रतिकूल वातावरणात भोगल्या ते ठिकाण पाहण्याची प्रेरणा मिळावी यासाठी अनुभव कथन आणि डॉ ज्योती चिंचणीकर व डॉ अमर अडके यांचे सावरकरांच्या अपरिचित जीवनातील गोष्टी यावर व्याख्याने झाली.
डॉ. ज्योती चिंचणीकर म्हणाल्या, सावरकरांवर टीका करणाऱ्यांना सावरकर समजलेच नाहीत. सावरकरांच्या काव्यपंक्ती सेल्युलर जेलमध्ये अखंड तेवणाऱ्या ज्योती च्या स्तंभावर लिहून ठेवलेल्या होत्या, त्या काव्य पुसून टाकण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या राजकीय नेत्यांच्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
इटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या क्रांतीकार्याने सावरकर भारावून गेले होते, जोसेफ मॅझिनीचे त्यांनी चरित्रही लिहिले आणि या चरित्रा पेक्षा सावरकरांनीच लिहिलेली प्रस्तावना खूप गाजली. सावरकरांनी आपल्या मराठीला शेकडो इंग्रजी शब्दांना (जसे की OFFICE= कार्यालय, MAYOR = महापौर… इत्यादी इत्यादी) पर्यायी मराठी शब्द उपलब्ध करुन देऊन राजभाषा समृद्ध केली असे प्रतिपादन डॉ अमर अडके यांनी यावेळी केले. नाशिक जिल्ह्यातील सावरकरांचे उपेक्षित ठेवलेले जन्म स्थान भगूर चा आता उत्तम विकास केल्याची माहिती दिली.
सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. नुकतीच अंदमानला भेट देऊन आलेले अतुल जोशी, डॉ ज्योती चिंचणीकर आणि डॉ. अमर अडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मकरंद द्रविड यांनी उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन केले. सौ. माधुरी जोशी यांनी आभार मानले.
यावेळी दिलीप जोशी, संजय कुलकर्णी, आदिती अडके, संदीप दंडगे, संदीप जोशी, विमल नाईक, शोभा अडके, डॉ.रविंद्र चिंचणीकर, केदार जोशी, गिरीश अडके, श्रुतकीर्ती द्रविड, रंजना कुलकर्णी, राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta