बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात एका पित्यानेच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळून पित्याने हा खून केला आणि त्यानंतर मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे सांगून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृताच्या मित्रांच्या सतर्कतेमुळे हा बनाव फार काळ टिकू शकला नाही.
चिक्कोडीतील इंदिरा नगर येथे राहणारा किरण उर्फ बाळासाहेब आलुरे (३१) असे मृताचे नाव असून, त्याचा पिता निजगुणी आलुरे याने ही हत्या केली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. किरण हा व्यसनाच्या आहारी गेल्याने घरात सतत वाद घालत असे. या त्रासाला कंटाळून निजगुणी याने आपला कामाचा मालक उस्मान मुल्ला याच्या मदतीने किरणचा गळा आवळून खून केला.
घटनेनंतर आरोपी पित्याने किरणचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची अफवा पसरवली. मात्र, किरणच्या मित्रांना त्याच्या मृत्यूबाबत संशय आला. त्यांनी निजगुणी आणि उस्मान या दोघांनाही गाठून प्रश्नांचा भडीमार केला. मित्रांच्या दबावापुढे अखेर निजगुणीने आपला गुन्हा कबूल केला आणि मुलाच्या उपद्रवाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे सांगितले. गुन्हा उघड होताच मित्रांनी दोन्ही आरोपींना पकडून चिक्कोडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण चिक्कोडी शहरात खळबळ उडाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta