सदलगा : सदलग्यातील भूमीगत सांडपाणी व्यवस्थेचे ड्रेनेज प्रक्रिया केंद्राला कर्नाटक शासकीय अधिकाऱ्यांनी आज भेट दिली.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रो. मोहनकुमार आणि प्रो.राव, केयुडब्ल्युएस धारवाडचे मुख्य अभियंता श्री. टी. एन्. मुद्दुराजण्णा, केयुडब्ल्युएस बेळगांवचे कार्यकारी अभियंता सुरेश मोरवाल, केयुडब्ल्युएस चिकोडीचे सहायक कार्यकारी अभियंता आर के उमेश आदींचा या अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता. ड्रेनेज प्रक्रिया केंद्राला मोठे भगदाड पडले होते त्यातून घाण पाणी शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातून वाहून साचून राहिले होते. पुढे महिनाभर दुर्गंधीयुक्त विषारी पाणी पुढे दूधगंगेच्या पात्रात मिसळले असल्याने कुणी शेतकरी शेतात जाऊ शकले नाहीत आणि पाणी सिंचनही करु शकले नाहीत. या दोन अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर आजच शासकीय अधिकाऱ्यांनी या प्लँटला भेट दिली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी या ड्रेनेजमधील अतिरिक्त दुर्गंधीयुक्त विषारी पाणी आमच्या शेतात येणार नाही अशी व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी यावेळी केली. शीतपेये पीत, काजू बदाम खात इथे ड्रेनेज सिस्टीमची अवस्था पहायला आलात हे योग्य नाही. या ड्रेनेज सिस्टिम मधून गळती लागून पुनः आमच्या शेतातून दूषित पाणी आल्यास या ड्रेनेज यंत्रणेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून दिल्या.
ही पाहणी करत असताना पीडीत शेतकऱ्यांशिवाय कुणी नगरसेवक, कुणी सामाजिक कार्यकर्ते कुणी लोकप्रतिनिधी कुणी कुणी उपस्थित नव्हते. पीडीत शेतकऱ्यांना या अधिकाऱ्यांनी म्युनिसिपालिटीमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन देऊन वाटेला लागले. यावेळी आनंद शितोळे दिलीप गुरव, बंडु करगावे, राजू मांग, बाळू गुरव, सुकुमार गळतगे, विद्याधर उगारे, महेश गुरव आणि दीडशेहून अधिक शेतकरीच उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta