
नदी काठावरील पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता; शेतकरी संकटात महापुराची धास्ती.…..
सदलगा : काळम्मावाडी व राधानगरी पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार वृष्टी झाल्याने तसेच सदलगा निपाणी परिसरात काल पासून अविश्रांत पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दूधगंगा नदीचे रविवार सकाळपासून पाण्याची पातळी पाच फूटाने वाढल्याने पाणी पात्रा बाहेर पडले आहे. नदीकाठच्या पिकांत पुराचे पाणी आल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके कुजून जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
जुना पुल यावर्षी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.
गेल्या चार पाच दिवसात या परिसरात दमदार स्वरुपात पावसाने हजेरी लावली तर शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर मुसळधार पावसामुळे तसेच तळ कोकणात पावसाचा जोर वाढल्याने दुधगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने पुन्हा महापुराच्या भीतीने याभागातील शेतकरी हतबल झाले आहेत. या भागातील बंधारे पुरामुळे पाण्याखाली जाणार आहेत.
दूधगंगा नदीच्या पात्रात पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ५३०.७२० पाण्याची पातळी, पाऊस: ११.०८ मि.मि, विसर्ग:५२८४ क्यूसेक्स, ४ फुटांनी पाण्याची पातळी वाढल्याने महापुराच्या धास्तीने आतापासूनच नदीकाठचे शेतकरी हतबल झाले आहेत. असाच पाऊस बरसला तर महापूर यायला वेळ लागणार नाही. पण माळभागातील नणदी नागरळ शिरगाव हिरेकुडी गिरगाव. नणदीवाडी नेज या भागातील विहीरी नाले ओढे तुडूंब भरुन वाहत आहेत. या भागातील पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणारा आहे. या परिसरातील पिके बहरली आहेत, यामुळे माळ भागातील शेतकरी मात्र सुखावला आहे. नदीच्या काठावरील शेतकरी महापुराच्या धास्तीने आपलीं जनावरे व शेतीच्या साहित्यासह स्थलांतरित होताना दिसत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta