सदलगा : सदलगा नगरपालिकेच्या रद्द झालेल्या प्रभाग क्र. ५, १२,१५ आणि १६ च्या नगरसेवक पदाच्या निवडणुका कर्नाटक राज्य निवडणुक आयोगाने २८ ऑक्टोबरला घेण्यासंदर्भात आदेश काढला होता. त्या निवडणुकीला आज धारवाड उच्च्य न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालय धारवाडचे सरकारी प्लीडर रविंद्र उप्पार यांच्या सहीच्या पत्रानुसार १४ ऑक्टोबर २०२२ रोजी रिट अपीलची सुनावणी सूचीबद्ध करुन २८ ऑक्टोबर २२ रोजी सदलगा नगरपालिकेचा होणारा निवडणूक कार्यक्रम ३ नोव्हेंबर २२ पर्यंत स्थगित करण्यात आला आहे आणि तशा तातडीच्या सूचना अत्यंत तातडीचे गृहीत धरुन संबंधितांना कळविण्यासंदर्भात कळविले आहे.
फक्त सदलगा नगरपालिकेच्याच मध्यावधी निवडणुकीला हा धारवाड उच्च्य न्यायालयाचा आदेश झाल्यामुळे सदलगावासीय संबंधित मतदार, उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे.
कर्नाटक राज्य निवडणुक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात १० ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर करण्यास सांगितले होते, १७ ऑक्टोबर रोजी नामांकन (अर्ज भरणे), १८ ऑक्टोबर रोजी छाननी, २० ऑक्टोबर रोजी अर्ज माघार घेण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती. २८ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान आणि ३१ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यासंदर्भात आदेशात उल्लेखिलेले होते.
सदलगा नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ५, १२,१५ आणि १६ मधील भाजपच्या बी फॉर्मवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या यां प्रभागातील चारही नगरसेवकांच्या विरोधात भाजप गटाने कोर्टात दावा दाखल करुन त्यांचे नगरसेवक पदच्या निवडीला आणि पक्षांतराला आव्हान दिले होते. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने मध्यावधी निवडणुका घेण्याचा आदेश जाहीर केला त्यात सदलग्याच्या या चार प्रभागांच्या समावेश होता आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या, मतदारांच्या घरोघरी संपर्क सुरू झाला होता तो या स्थगिती निर्णयामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta