सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष!
चिकोडी (अण्णासाहेब कदम) : चिकोडी तालुक्यातील कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांना जोडणारा सदलगा – दत्तवाड रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोक्याचा बनला आहे. या रस्त्यावर किसान ब्रिजपासून दतवाड ब्रिजपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूनी खचला असून रस्त्यावर फुटा दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षभरापासून रस्ता दुरुस्तीसाठी आणलेली खडी व वाळू तशीच रस्त्यावर पडून आहे. सदलगा -दत्तवाड या रस्त्यावर कर्नाटकातील मुरूम, खडी व एम सेंड आणि लाल वाळू त्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वरचेवर दुरुस्तीसाठी येत आहे. कंत्राटदाराने घेतलेले काम पूर्णपणे वेळेवर केलेले नसून, खेबुडे मळ्याजवळील खचलेला रस्ता व पुढे मोरे मळ्याजवळ देखील रस्ता एका बाजूला खचला आहे. त्या ठिकाणी अजून भराव टाकणे गरजेचे असून त्याकडे वर्षभरापासून कॉन्ट्रॅक्टरचे लक्ष नाही. कामासाठी आणलेली खडी व वाळू तसीच रस्त्यावर पडून आहे. अशा रस्त्यावर प्रवासी रात्रंदिवस ये-जा करीत असतात परंतु ही प्रवाशांची तारेवरची कसरत आहे. अनेक वेळा अपघात होऊन देखील सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. हा एक योगायोगच म्हणावा लागेल. हा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा किंवा नवीन टेंडर काढून सदरचा सदलगा- दत्तवाड रस्ता पूर्णपणे नवीनच व्हावा अशी मागणी या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची व या मार्गावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व या विभागाचे आमदार, खासदार या जनतेच्या प्रतिनिधींनी त्या दुर्लक्षित असलेल्या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता त्वरित करावा अशी मागणी या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.