चिकोडी : चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून, सदलगा शहर परिसरातील शेतमाळ्यात पाणी शिरले आहे. किसान ब्रिज खालून देखील पाणी वाहत आहे. या दूधगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासातासाला वाढत आहे. त्यामुळे सदलगा शहरातील दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमने आज पुराने वेढलेल्या भागाची होडीने पाहणी करून संबंधित भागातील लोकांना वेळीच स्थलांतरित करण्यासाठी सूचना दिल्या.
या पाहणी पथकामध्ये सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, एनडीआरएफ टीमचे इन्स्पेक्टर बबलू बिश्वास, अग्निशमन दलाचे अधिकारी हनुमंत नरगुंडे, सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले, चिकोडी वनविभागाचे अधिकारी श्रीशैल भावने, रेवेन्यू डिपार्टमेंटचे अधिकारी चंद्रशेखर, ग्राम लेखाधिकारी नीलकांत खाडे, सदलगा केईबी डिपार्टमेंटचे कुमार लकुळे, सामाजिक कार्यकर्ते अतिक्रम पाटील, पत्रकार कैलास माळगे, अण्णासाहेब कदम, सुयोग किल्लेदार, तात्यासाहेब कदम, भूषण खोत, सदानंद मुतनाळे, बसवराज कोळी, सलीम सनदी, अकबर सनदी. या सर्वांसमवेत होडीने जाऊन पाटील मळा, कमते मळा, कणगले मळा, कोल्हापुरे मळा, पडार माळ. इत्यादी परिसराची पाहणी करून संबंधित भागातील लोकांना सुरक्षितस्थळी जाण्यासाठी आवाहन करण्यात आले. आता तूर्त स्थिती नियंत्रणाखाली असून सदलगा शहरवासीयांना पुराचा धोका तुर्त तरी नसल्याचे एनडीआरएफ टीमचे कमांडर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
याप्रसंगी सदलगा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एनडीआरएफ टीमने केलेल्या महापुरातील पाहणी कार्याचे कार्याचे कौतुक करीत होते. त्याचबरोबर चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदी पुराची परिस्थिती अनेक वर्षे कायम असून या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफच्या एका तुकडीचे सदलगा शहरी कार्यालय करावे, त्यामुळे पूरबाधित क्षेत्राला तातडीची मदत मिळू शकेल, अशी मागणी सदलगा या शहरातील सामाजिक कार्यकर्ते अतिक्रांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.