महापूर पाहण्यास येणाऱ्या सर्व जनतेला प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
चिक्कोडी : सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीला आता खूपच मोठा महापूर आल्याने सदलगा शहरातील अनेक स्त्रिया, लहान थोर मंडळी, पुरुष, तरुण वर्ग मोठ्या संख्येने व गटागटाने दूधगंगा नदी किनारी फार मोठी गर्दी करून महापूर पाहण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात आहेत. त्याचबरोबर दत्तवाड गावातील लहान थोर मंडळी, स्त्रिया, पुरुष देखील दत्तवाड पुलावर महापुराचे अवलोकन व पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पुलावर फार मोठी गर्दी करीत आहेत. महापूराचे क्षेत्र म्हणजे पर्यटन क्षेत्र नव्हे, फक्त पूर पाहण्याचा, दूरवर पसरलेल्या पाण्याचा आनंद घेणे एवढाच उद्देश असावा. परंतु या ठिकाणी भेळ, पावभाजी, मक्याचे कणीस, पाणीपुरी, चहाचे दुकान, आईस्क्रीम, भेलपुरी इत्यादी विक्रेत्यांचे मोठमोठे स्टॉल सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतात. त्यामुळे बघ्यांची खूपच मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे. जनतेने महापुराचा आनंद घ्यावा परंतु कोणत्याही प्रकारचे धाडस पाणी प्रवाहाशी करू नये, कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊ नये, सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या ठिकाणी येणाऱ्या जनतेला दिलेले आहेत. याचे पालन देखील पूर पाहण्यास येणाऱ्या नागरिकांनी पूर्णपणे तंतोतंत केले असून, यापुढेही जनतेने शांततेने आणि संयमाने पुराचे अवलोकन करून आलेला महापुर पाहण्याचा आनंद घ्यावा. ही महापूर पाहण्याची सुवर्ण संधी मात्र सामान्य जनता मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे चित्र मात्र येथील गर्दी पाहून दिसून येत आहे. नदीपात्रातील पाणी अजूनही वाढत असून महापुराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या जनतेने सावधगिरी बाळगावी, एवढेच या प्रसार माध्यमाच्या द्वारे सांगणे उचित होईल व जनतेचे प्रबोधन होईल म्हणून प्रसार माध्यमाच्या सदलगा येथील प्रतिनिधींनी सदलगा दूधगंगा नदी किनारी
व दत्तवाड नदी पुलावर भेट देऊन केलेला हा समाज प्रबोधनाचा व प्रसारमाध्यमाच्या सामाजिक बांधिलकीचा प्रयास.