चिक्कोडी : कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करत चिक्कोडी येथे डॉक्टरांनी निदर्शने केली. चिक्कोडी शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चिक्कोडी शहर व तालुक्यातील डॉक्टर व नर्सिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सार्वजनिक रुग्णालयापासून सुरू झालेली निषेधची रॅली राणी चन्नम्मा रोडवरून पुढे बसव सर्कल येथे जाऊन सांगता झाली. कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी त्यांनी मानवी साखळी करून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
यावेळी आंदोलक डॉक्टरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोलकाता येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे. तरच अशा घटनांना आळा बसेल, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta