सदलगा : गेल्या तेरा वर्षांपासून सदलगा येथून शिमोगा आणि भद्रावती अविरतपणे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस सेवा सुरु आहे. याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश यांच्या सहकार्याने व सदलगा शहरातील माजी नगरसेवक पिरगौडा पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून शिमोगा शहराच्या पुढे असलेल्या भद्रावतीला सदलग्यातून दररोज रातराणी बस सेवा सुरु झाली आहे, अशी माहिती सदलगा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि एस टी सेवेचे अभ्यासक पिरगोंड पाटील यांनी आज आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, सदलगा, भैनाकवाडी, वडगोल, मलिकवाड, नेज, बोरगांव, शमनेवाडी, जनवाड, चांदशिरदवाड, दत्तवाड, दानवाड एक्संबा या सीमा भागातील भाविकांना श्रुंगेरी, होरनाडू, कुके सुब्रह्मण्यम, धर्मस्थळ, हूम्स पद्मावती, श्रवणबेळगोळ आणि शिमोगा परिसरातील ऐतिहासिक पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांना, तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी या सदलगा भद्रावती बसची एकमेव अशी उत्तम सोय सुरू सुरू झाली आहे.
सदलगा परिसरातील मेंढपाळांच्या मेंढ्या, बकरी हरिहर, होन्नाळी, शिमोगा परिसरात मोठ्या प्रमाणात गवती कुरणांचे उपलब्धतेमुळे तेथे स्थायिक असतात. त्यांच्यासाठी ये जा करण्यासाठी ही बससेवा अत्यंत सोयीची झाली आहे.
भद्रावतीहून ४४० किलोमीटरचा प्रवास करणारी ही बस दररोज सायंकाळी ७.३० वाजता निघुन शिमोगा, होनाळी, हरिहर, राणेबेन्नूर, हावेरी, हुबळी, बेळगांव, चिकोडी, एक्संबा, सदलगा मार्गावर धावणार असून दुसरे दिवशी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान सदलग्यात पोचणार आहे. सदलग्यातून याच मार्गावर ही बस दररोज सायंकाळी ७.१५ वाजता निघुन भद्रावतीला दुसरे दिवशी सकाळी साडे पाच ते सहा च्या दरम्यान पोचणार आहे.
त्याचप्रमाणे नजिकच्याच काळात भटकळ-इचलकरंजी, मुर्डेश्वर, गोकर्ण, सिरसी, कुमठा, यल्लापूर, खानापूर, बेळगांव, चिकोडी, सदलगा, इचलकरंजी या मार्गावरुन, कोट्टुर उज्जैनी ते इचलकरंजी व्हाया गदग, यल्लम्मा सौंदत्ती, गोकाक, चिकोडी सदलगा इचलकरंजी या मार्गावरुन आणि बागलकोट सदलगा दिवसातून दोन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. तसेच पूर्वी सुरु असलेली नॉन एसी सदलगा बेंगळुरू स्लीपर कोच सेवा देखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि
चिकोडी विभागाची इचलकरंजी हूम्स पद्मावती ही रातराणी बससेवा देखील लवकरच सुरू होत आहे ही माहितीही पुढे पिरगोंड पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.
परिसरातील जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही पिरगोंड पाटील यांनी केले. ही रातराणी बस सेवा सुरु करण्यासाठी विभागीय नियंत्रक शिमोगा विभागाचे टी नविन कुमार, विभागीय वाहतुक अधिकारी दिनेश चन्नगिरी, भद्रावती आगारप्रमुख एन् मूर्ती आदींनी सहकार्य केले.
यावेळी महादेव पाटील, पुंडलिक पाटील, शिरीष खोत, किरण सूर्यवंशी, इरगोंड पाटील, सुनिल माने, आनंद केदारी, राजू वाली, पप्पू वडगोले, किरण पाटील अमित पाटील आदी उपस्थित होते.