सदलगा : येथील द्रविड शेरी भागातील दूधगंगेच्या पात्रात दत्तवाडकडील बाजूला बोरगांवचे सुमारे सहा मच्छीमार करणारे तरुण मासेमारी करत होते. दत्तवाडच्या तीरावर सहा तरुण दूधगंगेच्या पात्रात मासेमारी करताना बोरगावच्या एका मच्छीमाराच्या पायाला मगरीने धरुन ओढले. रेहमान बहुरुपी (वय ४० वर्षे) असे त्या मच्छीमाराचे नांव असून त्याच्या गुडघ्याच्या खलील भागात पिंडरीच्या मांसल भागात सुमारे आठ दहा ठिकाणी मगरीने चावे घेतले आहेत.
रेहमान या मच्छीमाराने प्रसंगावधान राखत आपला पाय मगरीच्या जबड्यातून शिताफीने काढून घेतला आणि नदीच्या काठाकडे वेगाने पोहत येत आपला प्राण वाचविण्यात यशस्वी ठरला.
मासेमारी करत असताना रबरी इन्नरच्या सहाय्याने तरंगत जाळी सोडून नदीतील मासे पकडण्यासाठी सहा तरुण नदीपात्रात उतरले होते. मगरीने पात्रातील रेहमान या तरुणाचा पाय आपल्या जबड्यात पकडून त्याला ओढलं. रेहमानच्या उजव्या पायाला मगरीने जबड्यात धरले आहे हे जाणवले असता रेहमान रबरी इन्नरचा आधार घेत दुसऱ्या पायाने मगरीची पकड सैल करत आपली सुटका करुन घेतली आणि वेगाने नदीचा काठ गाठत आपली प्राणांतिक मगरमिठीतून सुटका करून घेतली.
रेहमानसोबत आप्पासाहेब गोसावी, मारुती बागडी, राजू बागडी, संभाजी गोसावी, पिंटू गोसावी या सोबत्यांची घाबरगुंडीं उडाली . रेहमानला पुढील उपचारासाठी माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दवाखान्यात नेले.
सहा सात महिन्यांपूर्वी महादेव खुरे या वृद्धाला कंटी भागात मगरीने ओढून नेले, त्यात खुरे गतप्राण झाले होते. तर , सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी प्रदीप इंगळे या तरुणावर नदीकाठच्या उतारावरील जमिनीत वैरण कापत असताना मगरीने शेपटीने फटकारा मारुन पाण्यात ढकलले होते, पाठोपाठ मगरीने पाण्यात उडी मारुन प्रदीप इंगळे वर हल्ला चढवला होता आणि पाय आपल्या जबड्यात धरले होते. त्यावेळी प्रदीपने मगरीचे डोळे खोबणीतून उपसून काढले तेंव्हा मगरीने आपल्या जबड्यातून पाय सोडले , तात्काळ प्रदीपने मगरी पासून बाजूला होत नदीकाठावर आला होता या घटनांची आठवण सदलगावासीयांना यानिमित्ताने झाली.
दूधगंगेच्या पात्रातील मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नाटक शासनाच्या वन विभागाने तातडीने पावले उचलली पाहिजेत असा सूर बागडी समाजातील मच्छीमारांच्यात उमटत आहे.