चिक्कोडी : इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमी जवळील दुहेरी वाहतुकीच्या रस्त्याचे बांधकाम लवकर पूर्ण करावे व अपघातांची मालिका टाळावी अशी प्रवाशांची मागणी.
इचलकरंजी- सदलगा या मार्गावर पंचगंगा पुलाच्या शेजारी असणाऱ्या नूतन पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येत असून त्याच्या पुढील रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पंचगंगा पुलाजवळ एकेरी वाहतूक सुरू असून त्याचा विपरीत परिणाम प्रवासी वाहतुकीवर व दुचाकी स्वारावर होत आहे. सध्या वाहतुकीची मोठी कोंडी होत असून अनेक वाहने रस्त्यावर थांबून असतात, त्यामुळे नागरिकांना मुठीत जीव धरून त्या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. कर्नाटक सीमा भागातील सदलगा, बेडकीहाळ, बोरगाव, शमणेवाडी, कारदगा, डोणेवाडी, जनवाड, एकसंबा, मलिकवाड, वडगोल, भोज इत्यादी भागातून महाराष्ट्रात कामासाठी जाणाऱ्या कामगारांची संख्या भरपूर आहे. त्याची दखल संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन इचलकरंजी शहरानजिक असणाऱ्या पुला जवळील रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, व प्रवाशांना सुखकर प्रवासाची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सदलगा भागातील प्रवासी व दैनंदिन ये- जा करणारे कामगार या वर्गातून केली जात आहे,
इचलकरंजी ते सदलगा या मार्गावर हजारो कामगार इचलकरंजी शहरासाठी व इतर ठिकाणी कामासाठी दररोज ये जा करीत असतात. या मार्गावर आत्ता सध्या नूतन दुभाजकाजवळ रस्त्याचे काम सुरू असून एकेरी वाहतूक सुरू आहे, ती वाहतूक लवकरात लवकर दुहेरी करावी म्हणजे या मार्गावरून ये जा करणाऱ्या कामगारांना व प्रवाशाना प्रवास करणे सुखकर होईल. आता सध्या प्रवासी वर्गाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आतापर्यंत या मार्गावर अनेक लोकांचा बळी गेला आहे. अपघातांची मालिका सुरूच आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने इचलकरंजी ते सदलगा या मार्गावरील पंचगंगा नदीवर असणारे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांना रस्ता मोकळा करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.