माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
चिकोडी : देवाने शुद्ध अंतकरणाने सत्कार्य करण्याचे शरीर आपल्याला जीवन जगण्यासाठी दिले आहे. चार तत्त्वांचे पालन करून आदर्श जीवन जगावे. माणसाची वाटचाल ही चांगले उद्देश ठेवून व्हावी. कवटगीमठ कुटुंबीयांनी आपला वाढदिवस वैयक्तिक न साजरा करता समाज हितासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करून समाजसेवेचा वसा जपला आहे. आपला वाढदिवस नागरिकांसाठी उपयोगी ठरावा या उद्देशाने संस्थेच्या शाखेचे उद्घाटन, रक्तदान, कॅन्सर रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पतसंस्था या तळागाळातील लोकांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतात. संस्था चालविताना हेड, हॅन्ड, हार्ट हे चांगले असावेत. सध्याच्या काळात आयुष्य व आरोग्य महत्त्वाचे आहे. कवटगीमठ यांचे समाजकार्य असेच फुलत राहावे व त्यांच्या कुटुंबाकडून अशीच समाजसेवा व्हावी, असे प्रतिपादन निडसोशी येथील पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी केले.
माजी विधानपरिषद सदस्य व राज्य सरकारचे माजी मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित श्री. महांतेश कवटगीमठ सौहार्द संस्थेचे उद्घाटन तसेच केएई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळाच्या वतीने आयोजित रक्तदान, कॅन्सर रुग्ण तपासणी शिबिराच्या संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. शेगुनशी येथील महांत स्वामी यांनी, कवटगीमठ कुटुंबाने जात, धर्म, भाषा पलीकडे जाऊन शिक्षण व अर्थकारणाच्या संस्थांचे कार्य विस्तारित केले आहे. समाजात सर्वांना शहाणे व समृद्ध करण्याचे कवटगीमठ कुटुंबीयांचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगितले.
चिकोडीच्या चरमुर्ती मठाचे संपादना स्वामी यांनी माणसाचे जीवन हे आदर्शवत असावे. प्रारंभी विद्या व नंतर धन कमवावे पण ते सत्कार्यासाठी वापरताही यावे. कवटगीमठ यांनी या भागाच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले आहे. सत्ता असताना कुणीही काम करू शकतो, पण सत्ता नसतानाही त्यांचे समाजकार्य निरंतर सुरू आहे. शेतकरी, महिला व पीडितांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सहकारी संस्थांचे पात्र अत्यंत महत्त्वाचे आहे. संस्थांनी अविकसितांचे अश्रू पुसण्याचे काम करावे तर कर्जदारांनी घेतलेले कर्ज वेळीच भरून संस्थांच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन केले.
माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी, विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे कवटगीठ कुटुंबीय आहे. या भागातील जनतेने ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरत आम्ही वाटचाल करीत आहोत. चिकोडी तालुक्याचे सहकार क्षेत्रामध्ये मोठे योगदान असून जन्म व मृत्यूच्या मध्यामध्ये आपण कसे व कोणासाठी जगलो याला फार महत्त्व आहे. आपले जीवन समाजमुखी असावे या तत्त्वावर आपली वाटचाल आहे. आपले जीवन माता-पिता, गुरु व समाजाचे ऋण फेडण्यासाठी जगावे. सत्ता ही शाश्वत नसते, पण मिळालेल्या सत्ताकाळात नागरिकांची सेवा प्रामाणिकपणे केली आहे. राजकारण म्हणजे वाघावरच्या सवारीप्रमाणे असते. त्या प्रवाहातून बाहेर पडता येत नाही. आपले समाजकार्य कायम सुरू राहावे यासाठी या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. लवकरच निपाणी, गदग, हुबळी येथे शाखा सुरू करण्यात येतील. पूर्वी राष्ट्रीयीकृत बँका सामान्यांना कर्ज देणे टाळत होते. पण आज याच बँका कर्ज देण्यासाठी विविध ठिकाणी आग्रह करीत आहेत. त्यांची स्थिती पाहून सहकार क्षेत्रातील संस्थांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ग्राहक हा राजा असतो, त्यांना तत्पर व प्रामाणिक सेवा देणे संस्थेचे कार्य आहे. चिरंजीव शरतचंद्र यांच्या नेतृत्वाखाली संस्था जागरूकतेने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तिन्ही स्वामींच्या हस्ते महांतेश कवटगीमठ यांचा सत्कार करण्यात आला. चिकोडी, निपाणी, रायबाग आदी तालुक्यातून आलेल्या अनेक मान्यवर व हजारो कार्यकर्त्यांनी महांतेश कवटगीमठ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. व्यासपीठावर चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, चंद्रकांत कोठीवाले, माजी नगराध्यक्ष जगदीश कवटगीमठ, नगराध्यक्षा विणा कवटगीमठ, महांतेश कवटगीमठ सौहार्द सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र मुतगेकर, उपनगराध्यक्ष इरफान बेपारी आदी उपस्थित होते. यावेळी चिदानंद कोरे कारखान्याचे संचालक भरतेश बनवणे, अजित देसाई, मल्लाप्पा म्हैसाळे, माजी संचालक प्रकाश पाटील, चिकोडीच्या सीटीई संस्थेचे उपाध्यक्ष विजय मांजरेकर, युवा नेते उत्तम पाटील, ओंकार कुलकर्णी, किरण कुलकर्णी, डॉ. मिथुन देशपांडे, श्रीनिवास जागीरदार, प्रकाश पाटील, पोपटलाल शहा, आदिनाथ शेट्टी यांच्यासह मान्यवरांनी कवटगीमठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री महांतेश कवटगीमठ सौहार्द सहकारी संस्थेचे अध्यक्ष शरतचंद्र कवटगीमठ यांनी स्वागत तर चिकोडी शाखेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरभावी यांनी प्रास्ताविक केले.
Belgaum Varta Belgaum Varta