स्वप्नं मोठ्ठी पहा, मोठ्ठी ध्येयं ठेवा, जिज्ञासा जागृत ठेवा : डॉ. प्रकाश तेवरी
सदलगा : सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये यावर्षी गुरुदेव सन्मान पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ प्रकाश तेवरी होते. हा पुरस्कार सदलगा हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि जनरल इलेक्ट्रिकल्स (जीई) या अमेरिकन बलाढ्य कंपनीत काम करुन श्च्नायडर इलेक्ट्रिकल या तितक्याच तोलामोलाच्या कंपनीचे निवृत्त अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी प्रायोजित केला आहे.
प्रसाद कुलकर्णी प्रायोजित गुरुदेव सन्मान पुरस्कार २०२४-२५ चे चार मानकरी अनुक्रमे केजी साठी पूनम जाधव, प्राथमिकसाठी ॐ पाटील आणि सेकंडरी सेक्शनसाठी अर्चना भीमराई आणि स्वाती भोसले हे ठरले. सलग दहा वर्षे हा गुरुदेव सन्मान पुरस्कार दिला जात असून यावर्षी देखील हा रोख रक्कम, पुष्पगुच्छ आणि संस्तमरणीय सन्मान पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिला. सलग गेली दहा वर्षे हा पुरस्कार प्रसाद कुलकर्णी प्रायोजित करतात त्या प्रित्यर्थ अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण आणि करिअर गायडन्स अशा विषयांवर खूप सोप्या पद्धतीने डॉ. प्रकाश तेवरी यांनी ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्लिष्ट विषयाची छोट्या छोट्या भागात फोड करून अखंड विषयावर प्रभुत्व मिळविण्याची लकब समजावून सांगितली.
१० वी तुमचे उच्च शिक्षणाची दिशा ठरवते तर ११वी आणि १२ वी तुमचे विशिष्ट उच्च शिक्षणासाठीचा मार्ग पक्का करते. मनावर ताण तणाव न घेता समजून घेऊनच शिक्षण घ्यावे.
नेहमी NCERT ची पुस्तके संदर्भासाठी घेऊन नोट्स काढाव्यात. अभ्यास करणे पुढे ढकलू नका. कठीण वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास टाळू नका. तुलना अन्य कुणाशी करु नका, स्वतःशीच तुलना करा. डिजिटल सुविधेचा काळजीपूर्वक अभ्यासासाठीच वापर करा, भविष्यातील आपल्या उच्च शिक्षणासाठीची दिशा आठवी ते दहावी याच दरम्यान ठरवा आणि त्या दिशेनेच आत्मविश्वासपूर्वक प्रयत्नशील रहा.
कन्नड, मराठी आणि इंग्लिश माध्यमाचे अध्यापक आणि विद्यार्थी या व्याख्यानास उपस्थित होते.
मोठी स्वप्नं पहा, जिज्ञासू वृत्ती जोपासा आणि मोठी ध्येय ठेवा असा मौलिक सल्लाही दिला. त्यांनी केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी बद्दल व्हिडिओ द्वारे माहिती दिली.
यावेळी सदलगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक डॉ. रावसाहेब पाटील, अशोक उगारे, डॉ. ज्योती चिंचणीकर, शरदकुमार लडगे, रमेश माने, संजीव कोरे, प्राचार्य एच्. एन्. सय्यद, सदलगा हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. जी. लंगोटे आठवी ते दहावीचे विद्यार्थी, सदलगा हायस्कूलचे शिक्षक, सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिक्षक उपस्थित होते.
गेली दहा वर्षे प्रसाद कुलकर्णी गुरुदेव सन्मान पुरस्कार प्रायोजित करून एक उच्च विद्याविभूषित महनीय व्यक्ती सदलगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोबत आणतात याबद्दल प्रकाश पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात शारदेच्या पूजनाने केली.
अश्विनी संकाजे यांनी स्वागत केले. प्रविण कुर्वे यांनी आभार मानले.