बेळगाव (प्रतिनिधी) : पुणे-बंगलोर महामार्गावरील एम. के. हुबळी येथे धाबा चालवणाऱ्या एका युवकाची हत्या झाली आहे. दोन गटातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या या धाबा मालकावर हल्ला झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. प्रकाश नागनुर (वय 38) असे त्याचे नाव आहे. या घटनेमध्ये कित्तूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबतची माहिती अशी की, रविवारी सायंकाळी या धाब्यात आलेल्या युवकांच्या दोन गटात पंधराशे रुपयांच्या व्यवहारावरून मारामारी सुरु झाली. त्यावेळी धाबा चालकाने हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी या दोन्ही समूहातील युवकांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे गंभीर झालेल्या धाबा मालकाला हॉस्पिटलमध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच चौकशीसाठी काहीजणांना ताब्यातही घेतले आहे.