निपाणी : बेडकिहाळ येथील गळतगा रस्त्याच्या पूर्व भागातील बेल्ले मळ्यात गुरुवारी सकाळी सुमारे 7 ते 8 फुट मगर आढळून आली. परिसरात वावरणार्या तीन मगरींपैकी एक मगर मळ्यात दिसून आल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत माहिती मिळताच बेल्ले मळ्यात मगर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यावेळी ही मगर नजीकच्या विहिरीत दिसल्याचे निदर्शनास आले.
ग्रा. पं. सदस्य सचिन पाटील यांनी ग्रामपंचायतीला माहिती दिली. तत्काळ चिकोडी वनाधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याने वनाधिकारी प्रशांत तळावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक बी. बी. वारके यांनी मगरीला पकडण्यासाठी विहिरीमध्ये जाळे सोडले. शुक्रवारी सकाळपर्यंत मगर जाळीमध्ये अडकून सापडेल, असे सांगण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य मनोज जाधव, शिवानंद बिजले, प्रशांत पाटील, बाळासाहेब बेल्ले, सचिन बेल्ले, जावेद मुल्ला, सलीम मुल्ला व नागरिक उपस्थित होते.
