माध्यमिक शाळा नोकर संघटना : तहसीलदारांना निवेदन
निपाणी (संजय सूर्यवंशी) : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असताना देशात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण सर्वाधिक आढळल्यामुळे सतर्क झालेल्या कर्नाटक सरकारने आंतरराज्य सीमेवर निर्बंध कडक केले आहेत. हे करताना पुन्हा एकदा शिक्षकांना कोविड ड्युटी लावण्यात आली आहे. शाळा सुरू झालेल्या असताना तसेच दहावी परीक्षेच्या नियोजनात माध्यमिक शिक्षक व्यस्त असताना कोविड ड्युटी लावल्याने शिक्षक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अखेर कोविड कामातून मुक्त करण्याच्या मागणीचे निवेदन माध्यमिक शाळा नोकर संघटनेतर्फे ग्रेड टू तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्यातर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोलनाक्यावर अन्य राज्यातून येणार्या वाहनधारकांची कसून तपासणी केली जात आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल तसेच लस घेतलेले प्रमाणपत्र कर्नाटक प्रवेशासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे याची तपासणी करण्यासाठी शिक्षकांना नेमण्यात आले आहे. तसा आदेश तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी काढला आहे. मात्र सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शिक्षकांना शाळेत हजर राहून शाळा प्रारंभोत्सव, तासिकांचे नियोजन, शाळांची साफसफाई, पटसंख्या वाढीसाठी गल्लोगल्ली फिरून विद्यार्थी व पालकांना प्रवेशासाठी आवाहन करणे आदी कामे करणे आवश्यक आहे.
दहावी परीक्षा अवघ्या पंधरा दिवसांवर असल्याने माध्यमिक शाळेतील शिक्षकांना दहावीच्या निकाल वाढीसाठी आवश्यक नियोजन करणे तसेच परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन करणे अशी कामे करावी लागणार आहेत. अशास्थितीत तहसीलदारांनी कोविड ड्युटी लावल्याने शिक्षक वर्गात तीव्र नाराजी आहे. शाळा सुरूच नसत्या तर कोविड ड्युटी करण्यात कोणतीही अडचण नव्हती. मात्र आता शाळा सुरु झाल्याने शाळाबाह्य कामे नको अशी मागणी शिक्षक संघटनेने निवेदनात केली आहे. शिक्षकांची कोविड ड्युटी रद्द करावी, यासंदर्भात डीडीपीआय गजानन मन्नीकेरी यांनी तहसीलदारांना पत्र पाठवले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झालेला नाही. कोरोना संसर्गाची लागण लहान मुलांना होण्याची शक्यता अधिक असल्याने सरकारने तातडीने शाळा, महाविद्यालये बंद ठेवली. आता शाळा सुरु झालेल्या असताना शिक्षकांना कोविड ड्युटी लावली आहे. आंतरराज्य सीमेवर देशातील विविध राज्यातून प्रवासी येत आहेत. अशावेळी सदर प्रवाशांच्या संपर्कातून शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यास त्याचा शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. याचा विचार करण्याची मागणीही निवेदनात केली आहे.
—-
