Thursday , October 10 2024
Breaking News

आरक्षणामध्ये खुल्या प्रवर्गावर अन्याय

Spread the love

माजी आमदार काकासाहेब पाटील : पत्रकार परिषदेत माहिती
निपाणी : राज्य सरकारने जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर केले आहे. यामध्ये तालुका पंचायतीच्या 16 पैकी 8 जागांवर खुल्या प्रवर्गाला संधी दिली आहे. परंतु जिल्हा पंचायतीच्या 6 जागेपैकी केवळ एकाच बेनाडी या मतदारसंघात खुल्या प्रवर्गाला संधी मिळाली आहे. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर असल्याचा विचार करता यामध्ये मंत्री असलेल्या शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले दाम्पत्यांने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे होते. परंतु जाहीर झालेल्या आरक्षणावरून त्यांचा सरकारमध्ये वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गावर झालेला अन्याय कदापी सहन करणार नसल्याचा इशारा माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, निपाणी तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या 6 मतदारसंघापैकी बेनाडी हा एकच मतदारसंघ सामान्य झालेला आहे. चिकोडी तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर निपाणी तालुक्यातील बेनाडी, चिकोडी मतदारसंघातील 6 जिल्हा पंचायतीच्या जागांपैकी केरुर, अंकली, खडकलाट, पट्टणकुडी तर रायबाग मतदार संघातील नागरमुन्नोळी, करोशी या मतदारसंघांमध्ये सामान्य आरक्षण आले आहे. निपाणी तालुक्यातील मतदारसंघात बेनाडी सामान्य तर सौंदलगा (ओबीसी ए. महिला) कोगनोळी (ओबीसी, ए), कारदगा (ओबीसी, ए), बेडकीहाळ (एससी महिला), अकोळ (एस.टी) असे आरक्षण आले आहे. त्यामुळे मंत्री शशिकला जोल्ले बढाया मारताना सरकारमध्ये त्यांचे काही चालत नाही, हे यावरून प्रतिध्वनीत होत आहे.
सरकार पक्षाचा आमदार व मंत्री असताना जोल्ले यांनी किमान 4 मतदारसंघ सामान्य आरक्षण आणले पाहिजे होते. जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये त्या सक्षम तोंडघशी पडल्या आहेत. आपण आमदार असताना तालुका एकत्र होता. तरीही आम्ही आरक्षण आणतेवेळी 2 जनरल, 2 ओबीसी, 1 एससी अशा अशाप्रकारे आरक्षण आणून सर्वसामान्यांना सामावून घेतले होते. सद्यस्थितीत जाहीर झालेले आरक्षण पाहता भाजप पक्षातील कार्यकर्त्यांची गळचेपी होणार आहे, हे नाकारून चालणार नाही.
मतदारसंघ पुनर्रचनेवेळीही असाच गोंधळ झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. त्यावेळी 80 टक्के आमचे म्हणणे राज्य निवडणूक आयोगाने मानले होते. सध्या खासदारही भाजपचेच असल्याने त्यांनी देखील लोकसभा मतदारसंघातील आठही मतदारसंघात लक्ष देणे गरजेचे होते. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने जोल्ले दाम्पत्याचा सरकारमध्ये वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे.
आरक्षण जाहीर करताना सरकारने जोल्ले दाम्पत्याच्या म्हणण्याला कोणत्याही प्रकारे पसंती दिली नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आमदार व मंत्री असलेल्या शशिकला जोल्ले यांनी किमान तीन जिल्हा पंचायत मतदारसंघात सामान्य आरक्षण आणावे आपण यासाठी हरकती मागवून आक्षेप नोंदवणार आहे. निपाणी तालुक्याच्या शेजारी असलेल्या चिक्कोडी, अथणी, रायबाग या ठिकाणी जाहीर झालेल्या आरक्षणापैकी किमान दोन ते तीन ठिकाणच्या मतदारसंघात सामान्य आरक्षण आले असताना निपाणी मतदारसंघातील जिल्हा पंचायत मतदारसंघावर आरक्षणाच्या बाबतीत अन्याय झाला असल्याने या सर्वाला जोल्ले जबाबदार आहेत. त्यामुळे आमदार व मंत्री यांचे काम म्हणजे ’बडा घर पोकळ वासा’ असे झाले असून सरकारने आरक्षण जाहीर करून त्यांना विश्वासात न घेता एक प्रकारे सणसणीत चपराक दिली असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
——
आक्षेप नोंदवून न्याय मिळवून देणार
आपण आमदार असताना व यामागील आरक्षणाचा विचार करता यावेळी निपाणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 जागांपैकी केवळ एका जागेवर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण आले आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेता खर्‍या अर्थाने खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची गोची झाली आहे. त्यामुळे आपण हरकती मागवून आक्षेप नोंदवून न्याय मिळवून देणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

केंद्राने सीमाप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करणारा ठराव संमत

Spread the love  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव निपाणी : मराठी भाषेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *