बेळगाव : पावसाची चाहूल लागताच शेतकरी शेतीच्या मशागतीबरोबर भात पेरणी करत असताना रासायनिक खतंही वापरतात. कारण प्रत्येक शेतकऱ्यांना शेणखत मिळतेच असे नाही. त्यामुळे जमीनीत डिएपी, १९/२६/२६ तसेच इतर गोळी खतं वापरतात. त्यासाठी आधीच नियोजन करुन ठेवण्यासाठी शेतकरी खतं घेऊन ठेवतात. त्यांचा भाव एकदम वाढला वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला. कारण पिकवलेल्या पीकांला जेवढा भाव नाही त्याच्या दिडपट, दोन पट झाल्याने देशातील शेतकऱ्यांनी या भाववाढीला तीव्र विरोध केला. पण अनेक शेतकऱ्यांनी वाढीव भावाने खतं खरेदी केली. कारण खतांचा तुटवडा केंव्हा होईल सांगता येत नाही. पण भाव कमी झाले तरी आता कमी भावाने विक्री होणारी रासायनिक खतं शेतकरी सोसायटी अथवा दुकानातून मिळत नाही आहेत. आणि एखाद दुसऱ्या दुकानदाराकडे असलीच तर १३५० रू. ५० किलोचे पोते शेतकरी खरेदी करताहेत. तेही मोजक्याच शेतकऱ्यांना मिळत आहे. आता डिएपीसह इतर खतांचा तुडवडा झाल्याने पुन्हा शेतकरी हवालदील झाले आहेत. कृषी खाते अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास आश्वासनाशिवाय कांहीच मिळत नाही. तेंव्हा सरकारने गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा करावा. अन्यथा शेतकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील.
