जरळी (गडहिंग्लज) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे आज (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने पोल्ट्री शेडची भिंत कोसळून एका पुरुषासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची माहिती अशी, अजित अर्जुन कांबळे (वय ४८, रा. नांगनूर) त्यांची बहिण गिरीजा हिच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे ती माहेरी नांगनूर येथे राहत. गुरुवारी अजित, गिरीजा व त्यांच्या दुसर्या भावाची पत्नी संगीता बसाप्पा कांबळे (वय ४५, रा. नांगनूर) हे तिघेही गिरीजा हिच्या सासूला पाहण्यासाठी हरळी येथे गेले होते. दरम्यान, ते गावी परतत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी त्यांनी मुगळीपासून जवळ असलेल्या नूल मार्गावर असलेल्या भीमा शंकर माने यांच्या पोल्ट्रीजवळ आसरा घेतला. यावेळी वादळाच्या वेगाने अचानक भिंत कोसळून तिघेही गाडले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील चित्र फारच विदारक होते.
