बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन सादर
बेळगाव : महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भातील मार्गदर्शक सूचीच्या धर्तीवर कर्नाटक सरकारने देखील उत्सवाची मार्गसुची जाहीर करावी, अशी मागणी बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने जिल्हा पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे केली आहे. शासनाने गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्याबरोबरच या उत्सवाशी संबंधित मूर्तिकार, मंडप डेकोरेटर्स, इलेक्ट्रिशियन आदी कारागिरांना विशेष अनुदान पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
गणेशोत्सव संबंधित कारागिरांचे कोरोना सावटामुळे खूपच हाल झाले आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने यापूर्वी समाजातील विविध घटकांना पॅकेज जाहीर केले आहेत. ज्या पद्धतीने इतर घटकांना पॅकेजेस दिले आहेत. त्याप्रकारे उत्सवावर अवलंबित कारागीरांना देखील आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हा पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांना देण्यात आले.
या भेटीप्रसंगी गणेशोत्सवाच्या योजना संदर्भात चर्चा करण्यात आली. मागील वर्षाप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून मागील वर्षाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याचे या बैठकीत ठरले.
याप्रसंगी बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी नगरसेवक सतीश गौरगोंडा, गणेश दड्डीकर, सागर पाटील, उदय पाटील आदी महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta