मुख्यमंत्र्यांची माहिती : केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा, जलजीवनचा आढावा
बंगळूरू : कर्नाटकातील कळसा-भांडूरा, मेकदाटू जलाशय प्रकल्प, कृष्णा, भद्रा, प्रकल्पासह सर्व प्रलंबित जल प्रकल्पांना मंजुरी देण्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मंगळवारी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत मंगळवारी बंगळूरात आले आहेत. त्यांनी राज्यातील जलजीवन अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला व जलजीवन अभियान कार्यक्रम निश्चित वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली. त्यांच्याशी राज्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पाबाबत झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पा म्हणाले की, कर्नाटक सरकारने शेखावत यांना मेकेदाटू प्रकल्पासाठी प्रलंबित पर्यावरण मंजुरीसाठी मार्ग तयार करण्याचे आवाहन केले. त्याखेरीज, कृष्णा लवादाच्या आदेशाची राजपत्रातील अधिसूचना यासह कळसा-भांडूरी, अप्पर भद्रा आणि यत्तीनहोळ प्रकल्पांसाठी केंद्राकडून आवश्यक परवानग्यांबद्दलही चर्चा झाली. त्यांनी आम्हाला सर्व प्रकल्पाना मंजुरी मिळवून देण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्य सरकारच्या अधिकार्यानी केंद्रीय मंत्र्यांना जलजीवन मिशनच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. ग्रामीण कर्नाटकातील घरांना नळपाणी जोडण्यासाठी प्रकल्पांतर्गत ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात राज्य अपयशी ठरले आहे. आम्ही लवकरात लवकर अतिरिक्त 25 लाख नळ जोडणी देण्याचा प्रयत्न करू, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.
जलजीवन मिशन आढावा बैठकीत शेखावत यांनी कर्नाटकला हा प्रकल्प कालबद्ध पद्धतीने राबविला जावा याची काळजी घेण्यास सांगितले. त्यांनी राज्याला सल्ला दिला की, निती आयोगाने निश्चित केलेल्या यादगीर आणि रायचूर जिल्ह्यांना प्राधान्य देऊन या जिल्ह्यातील घराना तातडीने नळ जाडणी देण्यात यावी, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
कर्नाटकचे 19.91 लाख नळ पाणी जोडणी करण्याचे उद्दीष्ट आहे. चालू आर्थिक वर्षात, सरकारला 25.17 लाख कनेक्शन देण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर 2022-23 मध्ये 27.15 लाख आणि उर्वरित 10.72 लाख डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.
गृहमंत्री बसवराज बोम्माई आणि लघु पाटबंधारे मंत्री जे. सी. माधुस्वामी आणि केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …