खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी तालुक्यात १२ हजार लेबरकार्ड धारकांना सरकारकडून किटसचे वितरण करायचे होते. असे असताना २५०० कार्डधारकांना किटस वाटण्याची घिसाडघाई करून गोंधळ घातला आणि भाजपच्या नावाने शंक मारत जो प्रकार केला त्याचा आम्ही भाजपच्यावतीने निषेध करतो, असे तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, कार्यकारिणी सदस्य किरण येळ्ळूरकर, तालुका जनरल सेक्रेटरी गुंडु तोपिनकट्टी, शहर अध्यक्ष सुनील नायक, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, सुरेश देसाई, मीडिया प्रमुख राजेंद्र रायका, अल्पसंख्याक प्रमुख जॉर्डन गोन्सालवीस, वसंत देसाई, मारूती पाटील यावेळी उपस्थित होते.
तालुक्यात लेबरकार्ड धारकांना देण्यात येणाऱ्या रेशन किटच्या झालेल्या सावळ्या गोंधळाबाबत
चर्चा करण्यात आली. तालुक्याच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी सरकारने दिलेल्या 2500 लेबर कार्ड रेशनिंग किटचे वाटप केले होते त्या लोकांची नावे असलेल्या यादीची मागणी करण्यात आली व झालेल्या सावळ्या गोंधळाची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच यापुढील लेबरकार्ड धारकांना देण्यात येणारे रेशनिंग कीट लेबर डिपार्टमेंटतर्फे वाटण्यात यावेत अशीही जोरदार मागणी केली व या गैरकारभाराला जबाबदार असणारे लेबर इन्स्पेक्टरला त्वरीत निलंबित करण्यात यावेत अशी मागणी केली व या खात्याचे मंत्री शिवराम हेब्बार यांच्याकडेही या झालेल्या गैरकारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, १२ हजार लेबर कार्डधारकांपैकी २५०० किट आले होते. त्यापैकी जवळपास १५०० किटस शिल्लक ठेवण्यात आले होते. खऱ्या लेबरकार्ड धारकांना वंचित ठेवून काहीना दोन किटस देण्यात आल्याचे तालुक्यात चर्चीले जात आहे. हा लोकप्रतिनिधीचा हलगर्जीपणा आहे. उलट भाजप सरकारवर तोंडसुख घेणाऱ्या लोकप्रतिनिधीना १२ हजार लेबरकार्ड धारकांना किटस १२ हजार येईपर्यंत थांबायला हवे होते. केवळ राजकीय स्वार्थ ठेवून हे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बाबूराव देसाई, विठ्ठल हलगेकर यांनी लोकप्रतिनिधीच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला भाजपचे कार्यकर्ते हणमंत पाटील, संतोष दप्तरदार, श्री. बाळेकुंद्री व इतर उपस्थित होते.