कणकुंबी (वार्ताहर) : बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यांपैकी जांबोटी ते चोर्ला हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
गेल्या वर्ष भरापासून या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते परंतु ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क केल्याने रस्त्याची पुन्हा दुरावस्था झाली. त्यानंतर रस्त्याचे काम खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता परंतु केवळ आठच दिवसांमध्ये पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होऊन खड्ड्यांंनी पुन्हा उग्र रूप धारण केले. जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर पुन्हा ठेकेदाराने दगड माती घालून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला परंतु या मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरश: चाळनच झाली आहे. काही ठिकाणी तर खड्ड्यातून गाडी बाहेर काढणे फार अवघड झाले आहे.
विशेषत: कणकुंबी-चोर्ला यापैकी कणकुंबी वनखात्याच्या नर्सरी जवळ, त्यानंतर चोर्ला गावच्या अलीकडील दोन-तीन ठिकाणी वळणावर तसेच चिखल्यापासून ते कणकुंबी मार्गावर अतिशय मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही वेळेला तर खड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला जाऊन वाहने पडणे किंवा खड्ड्यात अडकून पडणे अशा घटना वारंवार घडत आहेत. दुचाकी-तसेच चारचाकी वाहनांबरोबरच अवजड वाहनांची सुद्धा दैनावस्था होत आहे. या मार्गावरील वाहतुकीचा विचार करता त्वरित खड्डे बुजवण्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गणेश चतुर्थी दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे तर रस्त्याची वाताहत झाली आहे.
बुधवार दिनांक 22 रोजी इचलकरंजी येथून येथील युवक जांबोटी-चोर्ला रस्त्यावरून गोव्याला जात असताना चिखले क्रॉसच्या वळणावर भल्या मोठ्या खड्ड्यात वाहन गेल्याने वाहनाचा टायर फुटन त्या ठिकाणी अपघात घडला. कसे बसे व खड्ड्यातून वाहन बाहेर काढून या सात-आठ युवकांनी रस्त्याच्या बाजूला पडलेले लहान-मोठे दगड गोळा करून दोन चार खड्डेे बुजवून टाकले. सामाजिक व्रत हाती घेऊन युवकांनी या रस्त्यावरचे दोन चार खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. त्यामुळे निष्काळजी प्रशासन आणि झोपी गेलेली जनता यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपट निघत आहे. जर चार आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले नाही तर जांबोटी येथे रास्ता रोको आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
