बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर तालुका समितीची कार्यकारिणी लवकर जाहीर व्हावी अशी अपेक्षा मराठी भाषिकांतून व्यक्त होत होती.
खानापूर तालुका समितीची एकीची प्रक्रिया मध्यवर्तीच्या माध्यमातून दोन्ही गट प्रमुखांच्या संमतीने पूर्ण झाली व नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खानापूर तालुका समितीची विस्तृत कार्यकारिणी देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र सुरुवातीपासूनच एकीत खोडा घालणारे काही कार्यकर्ते आपला हेतू साध्य न झाल्यामुळे बिथरले आणि त्यांनी थेट मध्यवर्तीच्या बैठकीत गोंधळ घातला.
शुक्रवारी मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची 17 जानेवारी हुतात्मा दिनासंदर्भात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत खानापूर तालुका समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणे अपेक्षित होते मात्र पी. एच. पाटील, रवी पाटील, राजू पाटील, सूर्याजी पाटील यांनी आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही आमच्या तालुक्यात एकी कशी केला असा प्रश्न मध्यवर्तीच्या वरिष्ठ नेत्यांना विचारत सभागृहात गोंधळ घातला.
मध्यवर्तीच्या पुढाकाराने खानापूर तालुका समितीमध्ये एकी झाली व तालुक्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. समितीमधील बेकीला कंटाळून राष्ट्रीय पक्षांकडे गेलेला युवा वर्ग समितीच्या मुख्य प्रवाहात सामील होत असताना तसेच संघटना मजबूत करून सीमालढ्याला बळ देण्याऐवजी पी. एच. पाटील, रवी पाटील, राजू पाटील, सूर्याजी पाटील यांच्यासारख्या आडकाठी आणणाऱ्यांनी बैठकीत गोंधळ घातला. त्यामुळे मध्यवर्तीच्या सभासदांनी नाराजी व्यक्त केली.