बेळगाव : काँग्रेसची प्रजाध्वनी यात्रा इलेक्शन पब्लिसिटी स्टंट आहे. निवडणूक आली म्हणून ३ महिने आधी ते जागे झालेत. नंतर ते गायब होतील, त्यांचा ध्वनीही गायब हिल आणि प्रजेलाही ते विसरतील अशी घणाघाती टीका भाजपने केली.
बेळगावात एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार बोलताना आ. अनिल बेनके यांनी काँग्रेसच्या प्रजाध्वनी यात्रेची खिल्ली उडवली. निवडणुकीच्या आधी तीन महिने जागे होऊन काँग्रेसवाले पब्लिसिटी स्टंट करतात. नंतर गायब होतात. अशा यात्रा-कार्यक्रम आम्ही दर आठवड्याला करतो. वर्षभर लोकांच्या समस्या ऐकतो, त्या सोडवितो. लोकांनाही हे माहित आहे. म्हणूनच ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे अशा प्रजाध्वनी यात्रा, पोलिटिकल स्टंट्सचा आम्हाला फरक पडत नाही. त्याविषयी आम्ही त्रास करून घेत नाही असे आ. बेनके म्हणाले.बेळगाव उत्तरमध्ये विरोधक मतदारांना गिफ्ट्स वाटत असल्याबद्दलच्या प्रश्नावर, आम्ही कधीच लोकांना गिफ्ट्स देत नाही. निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून लोकांची कामे करतो, हेच आमचे गिफ्ट आहेत असे ते म्हणाले. ५ वर्षांपूर्वी बेळगाव शहर काय होते आणि आता किती विकसित झाले हे आठवून पहा, असे ते म्हणाले. उत्तर मतदार संघात स्विमिंग पूल कामांअभावी, उदघाटनाअभावी सुरु झालेले नाहीत या मुद्द्यावर आधीच्या आमदारांच्या काळात नको तेथे, जिथे आधीच स्विमिंग पूल आहेत, त्यांच्याशेजारीच आणि अशोक नगरात तर दिवस योजनेच्या जागेत स्विमिंग पूल उभारण्यात आलेत. पाच-दहा लाख खर्चून कामे अर्धवट सोडण्यात आली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी करोडो रुपये लागतील असा आरोप त्यांनी केला. मर्जीतल्या कोणालाही कंत्राटे देण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आता केवळ इ-टेंडर पद्धतीनेच कंत्राटे दिली जातात असे आ. बेनके यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
यावेळी भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.