Wednesday , July 15 2026
Breaking News

शिक्षणाचा भार यंदाही अतिथी शिक्षकांवरच; कायमस्वरूपी भरतीकडे दुर्लक्ष

Spread the love

 

बेळगाव जिल्ह्यात १,६१७ अतिथी शिक्षकांची होणार नियुक्ती

बेळगाव : राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी यंदाही अतिथी शिक्षकांवरच शिक्षण व्यवस्थेची भिस्त राहणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण १,६१७ अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून त्याबाबतची यादी संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि प्रत्येक वर्गाला शिक्षक उपलब्ध व्हावेत, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही रिक्त पदे अतिथी शिक्षकांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. मात्र, कायमस्वरूपी शिक्षक भरती न करता तात्पुरत्या नियुक्त्यांवरच भर दिला जात असल्याने शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये १,३४९, तर माध्यमिक शाळांमध्ये २६८ अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यभरात सुमारे ५० हजार शिक्षक पदे रिक्त असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाही नियमित भरती प्रक्रिया गतीमान होत नसल्याने अतिथी शिक्षकांवर अवलंबून राहण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.

या नियुक्त्या दहा महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून स्थानिक पात्र पदवीधर युवकांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मागील वर्षी अतिथी शिक्षक म्हणून कार्य केलेल्या उमेदवारांचाही नियुक्ती प्रक्रियेत विचार करण्याच्या सूचना विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शाळांमधील वाढत्या रिक्त जागा आणि नियमित भरतीतील विलंब यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अतिथी शिक्षकांच्या तात्पुरत्या व्यवस्थेऐवजी शासनाने कायमस्वरूपी शिक्षक भरतीचा मार्ग स्वीकारावा, अशी मागणी शिक्षक संघटना आणि शिक्षणप्रेमींकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऊसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श होऊन दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुधोळगी (मुडलगी) तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *