Monday , September 21 2026
Breaking News

संध्या सुरक्षा योजनेत मोठा गैरप्रकार; अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येत बेळगाव जिल्हा अव्वल

Spread the love

 

बेळगाव : वृद्धांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या संध्या सुरक्षा पेन्शन योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पात्र वृद्धांना दरमहा १,२०० रुपये पेन्शन देण्यात येत असताना अनेक अपात्र व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येत बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संध्या सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय किमान ६५ वर्षे असणे आवश्यक आहे. मात्र, काही व्यक्तींनी आधार कार्डसह इतर कागदपत्रांमधील जन्मतारखेत फेरफार करून संबंधित यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपात्र व्यक्तींना पेन्शन मंजूर करण्यात आल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

वृद्धापकाळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आधार मिळावा आणि त्यांचे जीवनमान सुधारावे या हेतूने राज्य सरकार ही योजना राबवत आहे. मात्र, योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर राज्यभर विशेष पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली.

या तपासणीत राज्यातील तब्बल १५ लाख ९९ हजार अपात्र लाभार्थी आढळून आले असून त्यांची पेन्शन रद्द करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३० हजार अपात्र लाभार्थ्यांचा समावेश असून त्यांच्या पेन्शनवर गंडांतर आले आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांवर प्रशासनाने मोठी कारवाई केल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू असून पुढील काळातही अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *