Sunday , July 26 2026
Breaking News

मराठा बँकेच्या कारभारात भ्रष्टाचार?; कृतीशील मराठा समाज आक्रमक

Spread the love

 

बेळगाव : मराठा बँकेतील कथित अनियमितता, वाढता खर्च, नियमबाह्य नोकरभरती आणि संचालक मंडळाच्या कारभाराविरोधात ‘कृतीशील मराठा समाजा’च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बँकेतील आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पत्रकार परिषदेत बोलताना अमित देसाई यांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला. १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या संचालकांनी पद सोडणे अपेक्षित असतानाही काही संचालक पदावर कायम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेच्या नूतनीकरणासाठी मंजूर असलेल्या खर्चात मोठी वाढ करण्यात आल्याचा आरोप करत, बँकेला आर्थिक अडचणीत ढकलले जात असल्याची टीका त्यांनी केली. याशिवाय वशिल्याच्या आधारे मोठ्या प्रमाणावर नोकरभरतीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला.

दत्ता जाधव यांनी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख करत संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कार्यकाळ पूर्ण झालेल्या संचालकांनी ‘कूलिंग ऑफ पीरियड’चे पालन करणे बंधनकारक असतानाही नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही बैठका नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आल्याचे सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी केली.

यावेळी शरद पाटील यांनीही बँकेतील काही संचालकांवर निशाणा साधला. काही व्यक्तींच्या वर्चस्वामुळे संस्थेची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत संबंधितांना पदावरून दूर करण्याची मागणी त्यांनी केली. वार्षिक सर्वसाधारण सभेतील सहभाग मर्यादित राहतो असून अनेक सभासदांना प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. वारसदारांना विविध कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठा बँकेचे अस्तित्व टिकवणे, सर्वसामान्य सभासदांच्या हिताचे रक्षण करणे आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा अधिक सक्षम करणे हा या आंदोलनाचा उद्देश असल्याचेही स्पष्ट केले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी चौकशी करावी, अन्यथा कायदेशीर मार्गाने पुढील लढा उभारला जाईल, असा इशाराही देण्यात आला.

पत्रकार परिषदेला चंद्रकांत कोंडुसकर, नारायण अष्टेकर यांच्यासह मराठा समाजातील विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *