खानापूर : खानापूर तालुक्यातील कौंदल गावातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर येताच भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महादेव सुभाष कोळेकर (17) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लष्करात भरती न झाल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले.
डॉ. सोनाली सरनोबत यावेळी बोलताना म्हणाल्या की, एकदा अशा घटना घडल्या की कुटुंबासाठी खूप कठीण परिस्थिती निर्माण होते. मागचा पुढचा न विचार करता अशी तरुण मुले आत्महत्या करत निघाली तर पुढे परिवाराचे कसे होईल. हा देखील विचार तरुण पिढी करत नाही. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नियती फाउंडेशनने “नो सुसाईड” माध्यमातून विद्यार्थ्यांना, तरुण वर्गाला भावनिक स्थिरता, मानसिक दृष्ट्या आणि समर्थना विषयी शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. नियती फाउंडेशनच्या वतीने तरुण वर्गाला मार्गदर्शन करण्यात येत आहे व यासाठी आम्हाला तरुण वर्गाकडून पाठिंबा मिळायला हवा. असेही त्या म्हणाल्या. “आपण सर्वजण वैयक्तिक आणि राष्ट्रीय दोन्ही जीवनात एका मोठ्या संक्रमणातून जात आहोत. यादरम्यान, आपण सर्वांनी भावनिक दृष्ट्या मजबूत असणे व स्थिर असणे गरजेचे आहे.” “नोकरी, नाते संबंध पैसा हा माणसाकडे आज आहे उद्या नाही, पण आत्महत्या करून एकाचा जीव गेला तर तो परत येत नाही व त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर खूप मोठे संकट येते.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी तरुण वर्गाला कळकळीची विनंती केलेली आहे की रागाच्या भरात किंवा कोणत्याही दबावाखाली येऊन आत्महत्या करू नये, त्यांना कोणत्याही अडचणी असतील त्यांनी नियती फाउंडेशनशी संपर्क साधावा आम्ही त्यांना नक्कीच मदत करू. डॉ. सोनाली सरनोबत यांनी महादेवच्या कुटुंबीयांची संवाद साधला व यावेळी महादेवचे कुटुंबीय व हितचिंतक उपस्थित होते.