खानापूर : सर्व प्रकारची आमिषे दाखवून तसेच पैसे देऊन सभांना लोक जमवण्याची वेळ राष्ट्रीय पक्षांवर आली आहे. मात्र, म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेपुढे त्यांची सर्व आमिषे निष्क्रिय ठरली आहेत. निष्ठेच्या जोरावरच बेळगावसह खानापूर तालुक्यावर समितीची सत्ता स्थापन होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले.
खानापूर तालुका म. ए. समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर बुधवारी (ता. २२) दुपारी तीन वाजता झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्ष गोपाळ देसाई अध्यक्षस्थानी होते. सीमासत्याग्रही शंकर पाटील, नारायण लाड यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले. आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, कार्यालयामुळे कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन चर्चा करणे. राजकीय रणनीती आखणे सोपे जाईल. पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाच्या सूचना घेऊन वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय पक्षांचे म्होरके खोटे गुन्हे दाखल करून आमिषे दाखवून सीमालढ्यातील तरुणांना पक्षात घेत आहेत. भरकटलेल्या युवकांपर्यंत नेत्यांनी जावे. चळवळीला आणखी धार येईल, अशी सूचना रमाकांत कोंडुस्कर यांनी केली.
सुपा-हल्याळप्रमाणे तालुक्याची अवस्था होऊ नये यासाठी मराठी भाषिक मतदारांनी जागृत व्हावे, असे नारायण कापोलकर यांनी सांगितले. राजकीय वर्चस्व मिळविण्यासाठी समितीला पोषक वातावरण असल्याचे महादेव पाटील यांनी स्पष्ट केले.
सीमासत्याग्रहींच्या बलिदानाला गालबोट न लावता कार्यकर्त्यांनी प्राणपणाने सीमाचळवळीत स्वतःला झोकून द्यावे. विजय आपलाच आहे, असे विचार दत्ता उघाडे यांनी मांडले.
मारुती परमेकर, प्रकाश चव्हाण यांनीही विचार मांडले. यावेळी खजिनदार संजीव पाटील, उपाध्यक्ष कृष्णा मन्नोळकर, कृष्णा कुंभार, जयराम देसाई, मारुती गुरव, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, रुक्माण्णा झुंजवाडकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव सीताराम बेडरे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta