खानापूर : खानापूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांचे नाव जाहिर होताच काँग्रेसचे युवा नेते व इच्छुक उमेदवार इरफान तालीकोटी यांनी ताबडतोब बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली असुन पत्रकारांनी आपण बंडखोरी करणार काय असे विचारले असता ते म्हणाले की, आपण लवकरच आपले समर्थक व नेतेमंडळी यांची बैठक घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
आज काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील उमेदवार जाहीर करण्यात आले असून खानापुरातून सुद्धा उमेदवारी विद्यमान आमदारांना जाहीर केली आहे. ती मोठ्या वशिलेबाजीने आणि मोठ्या हुद्द्याच्या व्यक्तीची साथ असल्याने जाहीर करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली असून पुढे बोलताना ते म्हणाले की, तालुक्यात तळागाळातील काँग्रेसचे कार्यकर्ते व सामान्य गरीब जनतेचा विचार करून त्यांना विचारून जाहीर केले असते तर सर्वांचे समाधान झाले असते. आज ज्या पद्धतीने निर्णय काँग्रेस पक्षाकडून जाहीर केलेला आहे त्याच्यात घराणेशाही दिसून येते. तळागाळात काम केलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आज पक्षात किंमत नाही. ज्याच्याकडे वशिला, मोठे हुद्दे आहेत त्यांनाच पक्षात किंमत आहे असे दिसून आल्याने संपूर्ण मतदारातून नाराजी दिसून येत आहे. पुढचा निर्णय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी वडीलधारी मंडळी व हजारो कार्यकर्ते ज्यांनी मला तिकीट (उमेदवारी) मागण्यासाठी पुढे केले होते त्यांच्याशी चर्चा करून ते जे ठरवतील व ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे येत्या दोन-चार दिवसात मतदाराशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
मी स्थानीक असल्याने उमेदवारी मलाच मिळायला पाहिजे होती पण विद्यमान आमदारांना त्यांच्याबद्दल तालुक्यात नाराजी असताना देखील पक्षाने त्यांना तिकीट दिले आहे. पक्षाला त्यांनाच उमेदवारी द्यायची होती तर पक्षाच्या वरिष्ठांनी मला उमेदवारी मागण्यासाठी अर्ज करण्यास का सांगितले. त्यावेळेसच उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती. पत्रकारांनी त्यांना काँग्रेसमध्ये बंडखोरीचा झेंडा लावणार का असे विचारले असता याबाबत येत्या दोन-चार दिवसात सर्वांना समजेल असे सांगितले. 2018 साली मी उमेदवार नव्हतो व मी अपक्ष म्हणून निवडणूकही लढलो नव्हतो. मी पक्षासाठी कार्य करत आलो असल्याचे सांगितले.
आपण बंडखोरी केल्यास मुस्लिम मतदारांची आपणास साथ मिळेल काय असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मी आजपर्यंत कधी जातीभेद, भाषाभेद व भेदभाव केलेला नाही. मुस्लिम मतदार व अल्पसंख्यांक मतदार कोणाला साथ देतील हे येणाऱ्या निवडणुकीत सर्वांना दिसून येईल असे सांगुन अप्रत्यक्षपणे बंडखोरीचा इशारा त्यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta