


खानापूर : खानापूर मतदारसंघातून कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे अर्ज दाखल करण्यात आला. मिरवणुक खानापूर शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीत अग्रभागी भगवा ध्वज व भजनी पथक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व मूर्ती असलेली पालखी होती. त्यानंतर उमेदवार मुरलीधर पाटील, बेळगांव दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर तसेच खानापूर समितीचे सात शिलेदार यांच्यासह खुल्या जीपमधून नागरिकांना अभिवादन करत होते. ढोल ताश्यांच्या निनादात पारंपरिक वाद्यवृंदांच्या दणदणाट करत निघालेल्या मिरवणुकीत भगवे फेटे बांधून समिती कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता. मिरवणुकीत दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर, मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी तसेच खानापूर समितीचे ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत मुरलीधर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta