खानापूर : खानापूर तालुक्यातील गोधोळी गावाच्या हद्दीत धारवाड- रामनगर राज्य महामार्गावर शेतात पिकाला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या चार शेतकऱ्यांवर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन शेतकरी जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान केएलई इस्पितळात मृत्यू झाला तर अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे. सदर घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
सदर अपघाताचे वृत्त आमदार अंजली निंबाळकर यांना समजताच त्यांनी खानापूर शासकीय इस्पितळात जाऊन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले व सरकारी डॉक्टरांना तात्काळ शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सांगितले.
त्याबद्दल बोलताना अंजली निंबाळकर म्हणाल्या की, भाजप सरकारच्या अनास्थायीचे हे शेतकरी बळी असून शेतकरी बांधवांना शेतीसाठी दिवसा वीज द्या म्हणून वेळोवेळी हेस्कॉमला सांगितले आहे. सरकारी दरबारी योग्य तो पाठपुरावा केला आहे. परंतु हे भाजपा सरकार शेतकरी व जनसामान्यांच्या विरोधी आहे. घडलेली घटना ही अतिशय दुःखद असून आमदार अंजलीताई निंबाळकर व समस्त काँग्रेस कार्यकर्ते मृतांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
Belgaum Varta Belgaum Varta