
तपोभूमीचा हिंदूसंस्कृती संवर्धनार्थ अभिनव उपक्रम
खानापूर : आपल्या मुलांवर उत्तम संस्कार होण्यासाठी मुलांची तेजस्विता वाढविण्यासाठी व वैदिक संस्कारांचा वारसा घरोघरी सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. बालपणीच सुसंस्कारांचे बीजारोपण करता येते त्यासाठी श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ – गोवा तर्फे सुसंस्कारांचा वारसा घरोघरी पोहोचविण्यासाठी नेत्रदीपक कार्य सुरू आहे. भविष्यात समस्त हिंदूधर्मियांनी मोठ्यासंख्येने आपल्या पाल्यांवर उपनयन संस्कार करून देश बलवान करण्यासाठी समर्पित व्हावे व खानापूर – बेळगाव विभागात नवी क्रांती करावी असे आवाहनपर प्रतिपादन श्री दत्त पद्मनाभ पीठ, संचालक संजय कळंगुटकर यांनी केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ, स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, श्री क्षेत्र तपोभूमी – गोवा तथा संत समाज कुपटगिरी व रामगुरवाडी इदलहोंड यांच्या यजमान पदाखाली श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित, धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपाशीर्वादाने श्री रवळनाथ मंदिर, खानापूर – कर्नाटक येथे दि. १३ मे रोजी गुरुपीठाच्या वैदिक शिष्यांच्या पौरोहित्याखाली सामुहिक उपनयन संस्कार समारंभ सुसंपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या सामूहिक उपनयन समारंभात १४ बटुंचे मौजिबंधन करण्यात आले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित ॐ दत्त ब्रह्माश्रम, झाडनावगा – खानापूर येथे पूज्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने प्रारंभ झालेल्या वैदिक पाठशाळेची घोषणा व उद्घाटन दीपप्रज्वलनाने या उपनयन संस्कार समारंभात करण्यात आले, वेदमूर्ती त्रिंबक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही वैदिक पाठशाळा कार्यरत झालेली आहे.
आपल्या घराचा समृद्ध वारसा ज्या पीढीकडे देऊ पाहतो त्या पिढीला संस्कारांनी मंडीत करण्याचा या पंचक्रोशीतील जनतेला एक अलौकिक योग यानिमित्त प्राप्त झाला आहे. हे दैवी देणे पूज्य सद्गुरू कृपेने आम्हांस प्राप्त होत आहे. अशी कृतार्थतेने पालकांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर संजय कळंगुटकर – संचालक – श्री दत्त पद्मनाभ पीठ, रवी कोकितकर – जिल्हाध्यक्ष श्रीराम सेना, राजाराम जोशी – पदाधिकारी – श्री रवळनाथ मंदिर, अनिल कदम – मुख्याध्यापक- करंबळ, राजश्री तोपिनकट्टीकर – नगरसेविका – खानापूर, सागरजी – निवृत्त कृषि अधिकारी, राजू बिळगोजी – सचिव – विश्व हिंदू परिषद – खानापूर, सुदेश नाईक व डॉ. गौरेश भालकेकर – क्षेत्रीय प्रमुख – श्री दत्त पद्मनाभ पीठ, विश्वास किरमटे – अध्यक्ष – संत समाज कुपटगिरी, दत्ता बाचोळकर – अध्यक्ष – संत समाज रामगुरवाडी इदलहोंड आदि. मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन वेदमूर्ती त्रिंबक केदार यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta