खानापूर : गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची हुलकावणीच होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी पसरली आहे.
बुधवारी सकाळी पासुनच उष्णता वाढली होती. दुपारी वाढत्या उष्णतेमुळे जीवाची लाहीलाही होत होती. संध्याकाळी जोराचा वारा सुटला. आकाशात काळे ढग दिसत मात्र काही वेळातच जोराचा वारा सुटला तसे ढग बघता बघता नाहीसे झाले व आकाश मोकळे झाले व पाऊस नाहीसा झाला. गेल्या चार दिवसापासुन पावसाची हुलकावणी सुरूच आहे.
तालुक्यात वळवाचा मोठा पाऊस झालाच नाही. त्यामुळे यंदा शेतीची कामे रेंगाळली बऱ्याच ठिकाणी नांगरटणीची कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे पेरण्याची कामे ही रेंगाळली आहेत. बुधवारी काही ठिकाणी पाऊस झाला. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाची हुलकावणी सुरूच आहे.
गुरूवारी ही सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सर्वत्र आकाश भरून आले आहे. मात्र अद्याप पावसाचा पत्ता नाही. तालुक्यातील भात पेरण्या अजून संपलेल्या नाहीत. शेतकरी मात्र मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.