खानापूर : खानापूर तालुक्यातील गोधोळी ग्राम पंचायतीत मनरेगा व रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गोधोळी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी काल तालुका पंचायतीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर EO, खानापूरचे तहसीलदार, जिल्हाधिकारी बेळगाव, तसेच जिल्हा परिषदेचे चीफ सेक्रेटरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुका पंचायतीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसरना निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल उपस्थित होते. यावेळी त्यांनी EO ना सांगितले की ताबडतोब याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून गोधोळी गावच्या ग्रामस्थांना ताबडतोब न्याय देण्यात यावा,
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की, गोधोळी गावातील राम तळ्याच्या कामासाठी मनरेगा व रोजगार हमी योजनेतून दहा लाख रुपये मंजूर झालेला फंड ग्राम पंचायतीला आलेला असताना सुद्धा व्यवस्थित काम करत असलेल्या ऑपरेटरला बाजूला करून पीडीओ, इंजिनीयर, वॉटर मॅन आणि टेम्पररी शिपाई यांनी संगनमताने फंड आला नाही असे लोकांना खोटे सांगून सदर योजनेत काम केलेल्या लोकांची हजरी सहा दिवस भरलेली असताना तुम्ही काम बरोबर केला नाही म्हणून सदर लोकांना सहा दिवसाची हजरी देण्याऐवजी एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, हजरी दाखवून त्यांना कमी मजुरी देण्यात आली आहे. तसेच त्यांची कपात केलेली मजुरी कामाला न आलेल्या लोकांच्या नावावर दाखवून त्यांच्या खात्यावर मजुरीचे पैसे काढून भ्रष्टाचार केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच बाळगुंद येथील शेतकऱ्याला मनरेगा योजनेतून शेततळे निर्माण करण्यासाठी पाच लाखाचा खर्च दाखविलेला आहे, मनरेगा योजनेतून शेततळे निर्माण करण्यासाठी 98 हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम देता येत नाही परंतु ग्रामपंचायतीचे पीडीओ, इंजिनीयर व ग्रामपंचायत मेंबर यांनी संगनमताने कामाला न आलेल्या लोकांच्या खात्यावर जास्तीचे चार लाख रुपये दाखविले आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
बाळगुंद, गवळीवाडा या ठिकाणी आदिवासी व मंगेमारी लोकांची वस्ती आहे. ती जागा त्या वस्तीतील लोकांच्या नावे ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद नाहीत याचा गैरफायदा घेऊन तेथील ग्रां.पं सदस्य, पीडीओं, वसूली क्लार्क या तिघांनी मिळून प्रत्येक नागरिकाकडून दहा हजार, बारा हजार, पंधरा हजार, अशी मनाला येईल तशी रक्कम घेऊन ग्रामपंचायतची मीटिंग न बोलावता पंचायतीत ठराव पास न करता चुकीच्या पद्धतीने नावे नोंद करून नागरिकांची व पंचायतीची फसवणूक केली आहे. तसेच सदर जागेवर त्या वस्तीतील लोकांची नावे नोंद करायची असेल तर तालुका पंचायतीचे पीडिओ, तहसीलदार, जिल्हाधिकारी, व जिल्हा परिषदेचे सी एस, यांची परवानगी घ्यावी लागते परंतु त्यांची परवानगी नसतानाच सदर लोकांची नावे गैर मार्गाने ग्रामपंचायतीत नोंद केली आहे. त्यामुळे याची ताबडतोब चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. अन्यथा काही दिवसात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व चन्नम्मा चौकात आंदोलन करण्याचा इशारा गोधोळी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर गोधोळी गावातील 100 पेक्षा जास्त नागरिकांच्या सह्या असून 100 पेक्षा जास्त नागरिक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
खानापूर बेळगाव येथे निवेदन देऊन सर्व नागरिक रात्री गोधोळी गावात पोहोचले असता ग्रामपंचायतीचे दरवाजे उघडे असल्याचे व लाईट सुरू असल्याचे दिसून आले, असता नागरिकांना संशय आल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता वसुली क्लार्क, वॉटरमेन, तसेच दोन रोजगार मेट, पंचायतीचा ऑपरेटर नसताना त्याच्या रूममध्ये बसून पंचायतीच्या दप्तरात काहीतरी लिहीत बसले होते. त्यामुळे नागरिकांचा संशय वाढला असून नक्की गोलमाल काय आहे याचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta