खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील चिगुळे गावात दोन गटात झालेल्या मारामारीत 25 जण जखमी झाले आहेत. काहीजण किरकोळ जखमी आहेत तर काहीं गंभीर जखमीना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका व्यक्तींवर केएलईमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. खानापूर पोलीस पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हे दाखल करून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. राजकारण आणि गावातील सार्वजनिक जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, चिगुळे गावातील अनंत गावडे आणि वासुदेव चौगुले हे आपल्या शेतात मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी काम करत होते. त्यावेळी गावातील शिवाजी चौगुले हे गुरे घेऊन शेताकडे गेले असता अनंत गावडे व वासूदेव चौगुले यांनी शिवाजी चौगुले यांना त्यांची गुरे शेतात येऊन भात पिकाचे नुकसान करत आहेत यावरून जाब विचारला. यावरून बाचाबाची व वाद झाला होता. याचे पडसाद गावात उमटले मंगळवारी दुपारी शिवाजी चौगुले यांच्या घरावर पंचवीस ते तीस जणांनी मिळून हल्ला चढविला होता. यात रामनाथ चौगुले, शिवाजी चौगुले, यासह त्यांचे कुटुंबीय जखमी झाले होते. बुधवारी सकाळी याबाबत शिवाजी चौगुले व रामनाथ चौगुले यांनी आपल्या गटाची बैठक घेऊन खानापूर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देण्यासाठी तयारीत सुरू केली होती. याचवेळी महादेव गावडे यांच्या गटाने रामनाथ चौगुले यांच्या गटावर बुधवारी सकाळी तिखटपुड फेकून लाठ्याकाठ्यानी हल्ला केला त्यात शिवाजी चौगुले, अनंत चौगुले, रामनाथ नारायण चौगुले, रामा महादेव चौगुले, नारायण महादेव चौगुले, महादेव रामा गावडे, कामण बारकू चौगुले, गोमा महादेव चौगुले, रामा विठ्ठल चौगुले, विनोद विष्णू चौगुले, रिया रामनाथ चौगुले व महादेव अशोक गावडा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात आणण्यात आले असता त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर रिया रामनाथ चौगुले हिच्या डोक्याला जबर मार बसल्याने तिला अधिक उपचारासाठी के एल ई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटातील प्रभावती गावडे, महेश गावडे, प्रताप गावडे, आनंद गोविंद गावडे, सहदेव सुपडा गावडे, सुरेश सातू नाईक, रेष्मा गावडे, दुलाजी गावडे, अमित चौगुले, यांच्यावर ही बेळगाव सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर फिर्याद दाखल करण्यात आली असून दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेका विरोधातील लोकांची नावे लिहून फिर्याद दाखल केली आहेत. त्यामुळे गावातील जेष्ठ नागरिक, युवक तसेच महिलावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta