बंगळूर : खानापूर तालुक्यात नवीन बस स्थानक व बस आगाराची निर्मिती होत आहे. पण खानापूर तालुक्यात ग्रामीण भागाला जोडणाऱ्या पूरक बसेस नाहीत, शिवाय तालुक्यातील प्रमुख गावात उपबस स्थानकाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गुरुवारी बेंगलोर निवासी कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांना दिले. यावेळी त्यांच्या समवेत लैला शुगरचे एम. डी. सदानंद पाटील, भाजप नेते बसवराज सानिकोप, महालक्ष्मी ग्रुपचे संचालक चांगाप्पा निलजकर, ॲड. भोसले आदी होते.
या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुका हा दुर्गम व जंगल भगाने व्यापलेला खानापूर तालुका आहे. खानापूर तालुक्याच्या अनेक गावात आजही बसेस पूरक जात नाहीत. खानापूर या ठिकाणी नव्याने बस स्थानकाची व आगाराची निर्मिती होत असली तरी खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या नवीन बसेस नसल्याने खानापूर तालुक्यासाठी किमान 50 नवीन बसेस मंजूर करण्यात याव्या अशी मागणी कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्याकडे केली.
बिडी, नंदगड, जांबोटीत बसस्थानक केंद्र मंजूर करा
यावेळी खानापूर तालुक्यात आता नवीन आगार व बस स्थानक होत असले तरी खानापूर तालुक्यात जोडणाऱ्या अनेक ग्रामीण भागातील प्रमुख गावात उपबस स्थानकाची अत्यंत गरज आहे. यासाठी जांबोटी, बिडी तसेच नंदगड या ठिकाणी बस स्थानकाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी ही यावेळी परिवहन मंत्र्यांच्या कडे करण्यात आली. व तसेच त्यांना शुभेच्छा ही दिल्या.