उद्योग, महसूल, आरोग्यमंत्र्यांची घेतली भेट


खानापूर : खानापूर तालुक्यात महसूल, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आहेत. या समस्यांकडे संबंधित खात्यांच्या नूतन मंत्र्यांचे लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली.
माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी बुधवारी (दि. ७) बंगळूरमध्ये उद्योग मंत्री एम. बी. पाटील, आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव आणि महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची भेट घेऊन भाजप सरकारच्या काळात प्रलंबित राहिलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
खानापूर तालुक्यातील संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारी दवाखान्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. निविदा प्रक्रियेचे काम हाती घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी आरोग्य मंत्री गुंडूराव यांच्याकडे केली. तालुक्याचा औद्योगिक विकास खुंटला आहे. स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कृषी आणि पर्यटन व्यवसायांना पूरक उद्योगधंद्यांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने लक्ष द्यावे, असे साकडे उद्योग मंत्री पाटील यांना घातले.
Belgaum Varta Belgaum Varta