नंदगड : भुत्तेवाडी येथील वृध्दाच्या खूनाचा नंदगड पोलिसांना अवघ्या 24 तासात छडा लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी दोघा संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) यांचा त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. जागेच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या खून प्रकरणी नंदगड पोलिसांनी नागोजी परशराम सुतार (वय 55) व ओंकार कृष्णा सुतार (वय 26) यांना अटक केली असून त्यांनी खूनाची कबुली दिली आहे. शनिवारी सकाळी लक्ष्मण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले होते. नंदगड पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरविली. संशयीत आरोपी नागोजी हा मयत लक्ष्मणच्या मेहुणीचा मुलगा असून त्याचा लक्ष्मण यांच्या जागेवर डोळा होता. सदर जागा त्याला देण्यास लक्ष्मण सुतार विरोध करीत असल्याने शनिवारी ओंकार याच्या साथीने नागोजींने लक्ष्मण यांचा काटा काढला. असल्याचे समजते.
लक्ष्मण यांची पत्नी बाहेरगावी गेल्याची खात्री करून नागोजी आणि ओंकार यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर ओंकारने लक्ष्मण यांचे पाय धरून ठेवले तर नागोजीने त्यांच्या डोकीत दगड घातला. त्यानंतर पुन्हा कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांचा निर्घून खून केला. व संशय येऊ नये यासाठी त्यांनी दगड आणि कुऱ्हाड इतरत्र फेकून दिली होती. वृध्दाचा अशा पध्दतीने खून झाल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे असतांनाच सदर खूनात नागोजीचा हात असण्याची शंका आल्याने त्याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
गेल्या कांही वर्षांपासून लक्ष्मण आणि नागोजी यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. लक्ष्मण यांनी विरोध करून जागा देण्यास नकार दिल्याने नागोजीच्या मनात राग होता. नागोजीने संबंधीत जागेवर घर बांधण्यासाठी हालचाली चालविल्या होत्या. पण, पंचायतीत तक्रार दिल्याने तो अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने त्याचा निर्घृण खून केला. मात्र नंदगड पोलीसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावून दोघांना जेरबंद करून त्या दोघांची रवानगी हिंडलागा कारागृहात करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta