पुणे : विविध विभागात उच्च पदावर अधिकारी असल्याचा दावा करणारे अनेक बनावट अधिकारी सध्या उजडेत येत आहेत. आता पुण्यात बनावट मेजर सापडला आहे. पुण्यातून खानापूरातील बनावट मेजरला ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव आहे. लष्कराच्या गुप्तचर विभाग आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. चिखली येथे सापळा रचत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तो भारतीय सैन्यात मेजर या पदावर असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक करत होतो. पुण्यातील लष्कराच्या गुप्तचर विभागाने त्याला पकडले.
कोण आहे प्रशांत पाटील
प्रशांत भाऊराव पाटील (वय 32, रा. सोनवणे वस्ती, चिखली, मुळ रा. कुपटगिरी, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. पाटील याच्यावर यापूर्वीही महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केलेल्याचा गुन्हा दाखल आहे. प्रशांत पाटील हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. मुळचा खानापूरातील असणारा प्रशांत पाटील सध्या तो चिखलीतील सोनवणेवस्ती येथे राहतो. त्याने भारतीय लष्करात अधिकारी असल्याचे भासवून लष्करातील निवृत्त अधिकाऱ्याकडून दोन गणवेश विकत घेतले. त्याने खडकी येथील दुकानदार सुरेश मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून त्याने दोन युनिफॉर्म खरेदी केले. त्या साहित्याचे 4700 रुपये झाले होते. मात्र ते पैसे त्याने दिले नाही. आपण 2019 पासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असल्याचे तो सांगत होतो.
त्याच्याकडून आय फोनसह दोन मोबाईल, भारतीय सैन्य दलाचे दोन गणवेश, इतर साहित्य, तीन आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, गणवेश असलेले चार कलर फोटो असे साहित्य जप्त केले आहेत. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-2 ने संयुक्त कारवाई करून पकडले आहे. त्यांच्याकडे सदर्न कंमाडच्या पत्त्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड मिळाले आहे. प्रशांत पाटील याने सैन्य दलाचा युनिफॉर्म परिधान करण्यासोबत गणवेशातील फोटो लावून बनावट ओळखपत्र तयार केले. त्यानंतर तो सदनकमांड हेडक्वॉटर क्वीन्स गार्डन पुणे याठिकाणी अधिकारी असल्याचे सांगत होता. तसेच तो राहात नसलेल्या सदनकमांड पुणे या कार्यालयातील पत्त्याचा वापर करून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड काढून तयार केले होते. त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.